Join us

₹७ च्या शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; एका घोषणेचा परिणाम, ६३% स्वस्त मिळतोय शेअर

By जयदीप दाभोळकर | Updated: March 19, 2025 13:40 IST

Vodafone Idea shares: कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी ७.४४ रुपयांवर ५ टक्क्यांनी वधारला. याची पूर्वीची बंद किंमत ७.१० रुपये होती.

Vodafone Idea shares: टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी ७.४४ रुपयांवर ५ टक्क्यांनी वधारला. याची पूर्वीची बंद किंमत ७.१० रुपये होती. शेअर्सच्या या वाढीमागे एक घोषणा आहे. वास्तविक, कंपनीनं मुंबईत आपली ५जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. "या रोलआऊटसह, व्होडाफोन आयडिया स्पर्धात्मक किंमतीत व्यापक कव्हरेजसह मोबाइल अनुभव वाढविण्यास सज्ज झाली आहे," असं व्होडाफोन आयडियानं एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलंय. 

कंपनी योजना काय?

व्होडाफोन आयडियाच्या सुरुवातीच्या ऑफरमध्ये ग्राहकांना २९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी सुविधा मिळणार आहे. स्ट्रीमिंग, गेमिंग आणि रिअल-टाइम क्लाऊड अॅक्सेस सारख्या हाय बँडविड्थ अॅप्लिकेशची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते आपले नेटवर्क अधिक मजबूत करीत आहेत. व्होडाफोन आयडियानं मुंबईत ५जी रोलआऊटसाठी नोकियासोबत भागीदारी केली आहे. टप्प्याटप्प्याने देशभरात ५जी चा विस्तार करत राहणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

काय आहे अधिक माहिती?

व्होडाफोन आयडिया अजूनही आपली ५जी सेवा सुरू करत आहे, तर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या त्याच्या स्पर्धकांनी संपूर्ण भारतात ५जी सेवा रोलआउट पूर्ण केलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टेलिकॉम डेटाच्या आधारे डिसेंबर महिन्यात व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या १.७१ मिलियननं कमी होऊन २०७.२५ दशलक्ष झाली आहे. नोव्हेंबरमध्ये गमावलेल्या १५ लाख ग्राहकांपेक्षा ही संख्या अधिक होती. गेल्या १२ महिन्यांत व्होडाफोन आयडियानं २६,००० कोटी रुपयांची इक्विटी उभारली आहे, ज्यात भारतातील सर्वात मोठी फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) देखील आहे, ज्याद्वारे त्यांनी १८,००० कोटी रुपये उभे केले आणि ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रमोटर्सचं योगदान आहे. कंपनीने पुढील तीन वर्षांत ५० ते ५५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचं नियोजन केलंय.

शेअरची स्थिती काय?

व्होडाफोन आयडियाचा शेअर २०२४ च्या उच्चांकी १९ रुपयांच्या तुलनेत ६३% खाली आला आहे. हा शेअर त्याच्या एफपीओ किमतीच्या ११ रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. याची ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी ६.६० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५२,८३०.८५ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार