Zomato Swiggy Stocks: मोबाईल अॅपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर घरपोच पोहोचवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्ससाठी बुधवारचा दिवस वाईट ठरला आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो आणि स्विगीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.
सकाळच्या इंट्राडे सेशनमध्ये झोमॅटोचा शेअर ३ टक्क्यांनी घसरून १९९ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मंगळवारी झोमॅटोचा शेअर २०९ रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे, सकाळच्या सत्रात ३ टक्क्यांची घसरण झाल्यानं स्विगीचा शेअर ३२७ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. तर मंगळवारी स्विगीचा शेअर ३३७ रुपयांवर बंद झाला होता.
का झाली घसरण?
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दोन्ही शेअर्समध्ये झालेल्या या घसरणीचं प्रमुख कारण ग्लोबल ब्रोकरेज फर्म बोफा सिक्युरिटीज असल्याचं मानलं जात आहे. खरं तर बोफा सिक्युरिटीज ब्रोकरेजनं भविष्यातील वाढीच्या शक्यता आणि फूड डिलिव्हरी उद्योगात वेगानं वाढणाऱ्या स्पर्धात्मक दबावाबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे ब्रोकरेजनं या दोन्ही कंपन्यांचं रेटिंग कमी केलंय. तसंच टार्गेट प्राईजही कमी केली आहे. याशिवाय, ब्रोकरेज मार्केटची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन व्हॅल्युएशन अॅडजस्टमेंटही करत आहे.
Zomato-Swiggy चं टार्गेट प्राईज काय?
बोफा सिक्युरिटीज ब्रोकरेजनं झोमॅटोचं रेटिंग 'बाय'वरून 'न्यूट्रल' केलं असून शेअरची टार्गेट प्राइसही ३०० रुपयांवरून २५० रुपयांवर आणली आहे. दुसरीकडे, स्विगीच्या शेअरवर ब्रोकरेजनं रेटिंग कमी करून अंडरपरफॉर्म केलंय. याशिवाय टार्गेट प्राइसमध्ये मोठा बदल करण्याबरोबरच ३२५ रुपयांची नवीन टार्गेट प्राइस देण्यात आली आहे, यापूर्वी ब्रोकरेज ने स्विगीवर ४२० रुपयांची टार्गेट प्राइस दिली होती. स्विगीची नवी टार्गेट प्राइस स्विगीच्या ३९० रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा कमी आहे.
बोफा सिक्युरिटीज ब्रोकरेजनं दोन्ही शेअर्सच्या घसरणीला क्विक कॉमर्स सेगमेंटमधील वाढता तोटा आणि फूड डिलिव्हरी ग्रोथ मंदावण्याची शक्यता कारणीभूत असल्याचं सांगितलं. ब्रोकरेजचा अंदाज आहे की झोमॅटो, स्विगीची एबिटडा आर्थिक वर्ष २०२६ आणि २०२७ साठी सर्वमान्य अंदाजापेक्षा २० ते ५० टक्के कमी असेल.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)