काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वप्नवत वाटणारी बातमी वाचली असेल. एका कंपनीचा ३ रुपयांवर असलेला शेअर रातोरात सव्वा दोन लाखांवर पोहोचला. ३ रुपयांचे लाखो रुपये करणारा शेअर आपणही घेतला असता तर, असेही अनेकांना वाटले होते. हा शेअर त्यानंतरही वाढून ३,३२,३९९ रुपयांवर गेला होता. सव्वा दोन लाख झाल्यानंतर तो वाढतच होता. अनेकांनी यातही हात साफ करून घेतले. पण आता यात पैसे गुंतविलेल्यांवर अशी वेळ आलीय की त्यांना सांगताही येत नाहीय.
गेल्या पाच दिवसांत Elcid Investment Ltd हा शेअर ६१ हजारांनी पडला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले दिसत आहेत. हा शेअर सतत लोअर सर्किटवर जात असून त्याला कोणी खरेदीदारही मिळत नाहीय. यामुळे गुंतविणाऱ्यांचे पैसे अडकून पडले आहेत.
गुरुवारी या शेअरचा भाव १४ हजार रुपयांनी घसरून २,६९,१७२ रुपयांवर आला होता. हा शेअर खरेदी करणाराच कोणी नसल्याने या शेअरची किंमत घसरण कधी थांबेल याचा कोणालाच पत्ता नाही. यामुळे ज्यांचे सव्वा दोन लाख झाले ते मालामाल झाले असले तरी त्यानंतर पैसा ओतणारे मात्र धरताही येत नाही आणि सोडताही येत नाहीय अशा विचित्र परिस्थितीत अडकले आहेत.
दुसऱ्यांदा लिस्ट झाल्यानंतर या शेअरमध्ये मोठी वाढ झाली होती. आजही हा शेअर लिस्टिंग प्राईजपेक्षा ३२९२२ रुपयांनी वर व्यवहार करत आहे. जर खरेदीदारच मिळाला नाही तर यातून बाहेर पडणेही गुंतवणूकदारांना कठीण होणार आहे.