Join us  

Hyundai Motors IPO : पैसे तयार ठेवा! दिवाळीपूर्वी येऊ शकतो ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ, जाणून अधिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 11:19 AM

Hyundai Motors IPO : कंपनी आयपीओच्या माध्यमातून २५००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.

Hyundai Motors IPO : दक्षिण कोरियाची (South Korea) ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई मोटर इंडियाचा (Hyundai Motor India) आयपीओ १४ ऑक्टोबर रोजी उघडण्याची शक्यता आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून २५००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीच्या २१,००० कोटी रुपयांच्या आयपीओपेक्षाही ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ सर्वात मोठा असेल. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.

१४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत खुला

शेअर बाजार नियामक सेबीनं देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी कार उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटरच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. सेबीनं ह्युंदाई मोटरला ऑब्झर्व्हेशन लेटर जारी केलं आहे. ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होऊ शकतो आणि गुंतवणूकदारांना१६ ऑक्टोबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येऊ शकतो. पुढील आठवड्यात कंपनी आयपीओच्या प्राइस बँडची घोषणा करू शकते.

ओएफएसच्या माध्यमातून पैसे उभारणार

ह्युंदाई मोटरनं नियामकाकडे दाखल केलेल्या ड्राफ्टनुसार, कंपनी संपूर्ण ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून आयपीओमध्ये पैसे उभारणार आहे. विक्रीसाठीच्या या ऑफरमध्ये प्रवर्तक कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीकडून १४२,१९४,७०० शेअर्स ऑफर केले जातील. ह्युंदाई मोटर इंडियाला आयपीओच्या किंमतीनुसार १८ ते २० अब्ज डॉलरचं मूल्यांकन मिळण्याची शक्यता आहे. त्याचं मूल्य २८ अब्ज डॉलर आहे.

मारुतीनंतर ह्युंदाईचा क्रमांक

प्रवासी वाहनांच्या विक्रीत मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई मोटर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीचा सुमारे १५ टक्के मार्केट शेअर आहे. प्रस्तावित आयपीओवरील मूल्यानुसार ह्युंदाई मोटर इंडिया देशांतर्गत शेअर बाजारात महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, आयशर मोटर्स या अन्य लिस्टेड ऑटोमोबाइल कंपन्यांना मागे टाकेल. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनंतर ह्युंदाई २०२४ मध्ये आयपीओ आणणारी दुसरी ऑटोमोबाईल कंपनी आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारह्युंदाई एलीट आई 20