IPO News : तुम्हीही आयपीओमधून कमाई करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरू शकते. भारताची आयपीओ बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. बाजार नियामक सेबीकडे कंपन्यांचे अर्ज येत आहेत. भारतीय शेअर बाजारात सध्या आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्याची स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येतं. सोमवारी १३ कंपन्यांनी आयपीओसाठी आपली कागदपत्रं सेबीकडे सादर केली. सेबीनं या अर्जांना मान्यता दिल्यास या कंपन्या सुमारे आठ हजार कोटी रुपये उभारू शकतात.
या कंपन्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत, त्यापैकी अनेक कंपन्या नवीन शेअर्स जारी करण्याचा तसंच त्यांचे विद्यमान शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहेत. यामध्ये विक्रम सोलर, आदित्य इन्फोटेक आणि वरिंद्र कन्स्ट्रक्शन या सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. अजाक्स इंजिनीअरिंग, राही इन्फ्राटेक, विक्रान इंजिनीअरिंग, मिडवेस्ट, विनी कॉर्पोरेशन, संभव स्टील ट्यूब्स, जॅरो इन्स्टिट्यूट, ऑल टाइम प्लास्टिक आणि स्कोडा ट्यूब्स या कंपन्यांनीही कागदपत्रं दाखल केली आहेत.
येणार आयपीओंचा महापूर
तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील वाढता विश्वास दर्शवितो. या वर्षी आतापर्यंत ६२ कंपन्यांनी आपल्या आयपीओद्वारे ६४,००० कोटी रुपये उभे केले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत २९% जास्त आहे. येत्या काही महिन्यांत ह्युंदाई मोटर इंडिया, स्विगी आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी सारख्या कंपन्याही आयपीओच्या माध्यमातून ६०,००० कोटी रुपये उभारणार आहेत.
कोण किती निधी उभारणार?
विक्रम सोलरचा आयपीओ १,५०० कोटी रुपयांचा असेल, तर आदित्य इन्फोटेक १,३०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. वरिंद्र कन्स्ट्रक्शनचा आयपीओ १२०० कोटी रुपयांचा असेल. विक्रान इंजिनीअरिंगचा प्रस्तावित आयपीओ १००० कोटी रुपयांचा असेल. कोलकात्यातील राही इन्फ्राटेक आयपीओच्या माध्यमातून ४२० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. संभव स्टील ट्यूब्सचा आयपीओ ४४० कोटी रुपयांचा असेल. जॅरो इन्स्टिट्यूटचा आयपीओ ५७० कोटी रुपयांचा असेल. ऑल टाइम प्लॅस्टिकचा प्रस्तावित आयपीओ ३५० कोटी रुपयांचा असेल. तर स्कोडा ट्यूब्सचा आयपीओ २७५ कोटी रुपयांचा असेल.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)