Join us  

Opening Bell Today: इराण-इस्रायल तणावामुळे शेअर बाजारात हाहाकार; उत्तम निकालानंतरही इन्फोसिस आपटला, ONGCमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 9:57 AM

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी, शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू झालं. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 597 अंकांनी घसरून 71891 अंकांवर उघडला.

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी, शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू झालं. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 597 अंकांनी घसरून 71891 अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 152 अंकांनी घसरून 21995 अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविलेल्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये एव्हेन्यू सुपरमार्ट, ऑइल इंडिया, ओएनजीसी, टोरेंट पॉवर, एक्साइड इंडस्ट्रीज, कल्याण ज्वेलर्स आणि कोचीन शिपयार्ड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर बीपीसीएल, एचडीएफसी लाइफ, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, लार्सन आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.  

इस्रायलचा हल्ला 

इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या आण्विक केंद्रावरही क्षेपणास्त्र डागल्याचं म्हटलं जात आहे. इराणच्या आण्विक प्लांटकडे तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं (IRGC) आपल्या सर्व लष्करी तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे. 

प्री ओपन मार्केटची स्थिती 

शुक्रवारी, प्री ओपनींग मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 490 अंकांनी घसरला आणि 71999 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 134 अंकांनी घसरला आणि 21861 अंकांच्या पातळीवर काम करत होता. दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू होईल, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते.

टॅग्स :शेअर बाजार