IREDA share price: ग्रीन फायनान्सिंग एनबीएफसी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच इरेडाचे शेअर्सवर आज फोकसमध्ये होते. आजच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स १२ टक्क्यांनी वधारले आणि २६५.७५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. शेअर्सच्या या तेजीमागे एक चांगली बातमी आहे. कंपनी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP), राइट्स इश्यू आणि इतर माध्यमातून ४,५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचा विचार करत आहे. ही बातमी आल्यानंतर आज इरेडाच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी दिसून आली.
२९ ऑगस्टला बैठक
निधी उभारणीसंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती इरेडाने दिली. या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये १४४ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच अल्पावधीतच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. त्या तुलनेत या काळात बेंचमार्क निफ्टी ५० १४ टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनीचा व्यवसाय काय?
इरेडा ही न्यू आणि रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील मिनीरत्न कंपनी आहे. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअरनं ५६ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह शेअर बाजारात दमदार पदार्पण केलं होतं आणि तेव्हापासून शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. इरेडाचे शेअर्स ३२ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा ७१० टक्क्यांनी वाढले आहेत आणि ४९.९९ रुपयांच्या लिस्टिंग प्राईजवरून सुमारे ४२० टक्क्यांनी वधारले आहेत.
जून तिमाही निकाल
३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत इरेडाचा निव्वळ नफा ३० टक्क्यांनी वाढून ३८३.६९ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न या तिमाहीत ३२ टक्क्यांनी वाढून १,५०२ कोटी रुपयांवर पोहोचलंय. एनबीएफसीच्या मालमत्तेची गुणवत्ताही सुधारली.
ब्रोकरेजचं म्हणणं काय?
आयसीआयसीआय सिक्युरिटीज इरेडाच्या दीर्घकालीन वाढीच्या शक्यतांबद्दल सकारात्मक दिसून येत आहे. कंपनीनं या शेअरला बाय रेटिंग देत ३३० रुपयांचं टार्गेट प्राईज दिली आहे. यादरम्यान फिलिप कॅपिटलनं १३० रुपयांच्या रिवाईज टार्गेट प्राईजसह सेल रेटिंग कायम ठेवलं आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)