Share Market : मंगळवारी तेजीत बंद झालेल्या भारतीय शेअर बाजाराने आज गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढउतार पाहायला मिळाले. रेड सिग्नलमध्ये उघडलेल्या शेअर बाजारात मोठी रिकव्हरी झाली. पण, शेवटी पुन्हा एकदा विक्रीने जोर पकडला आणि बाजार तोट्यात आला. शेवटी लाल रंगात मोठ्या घसरणीसह बंद झाला. आज BSE सेन्सेक्स ४२६.८५ अंकांच्या घसरणीसह ७९,९४२.१८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५० देखील १२६.०० अंकांच्या घसरणीसह २४,३४०.८५ अंकांवर बंद झाला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपने तारलंदिवाळीच्या एक दिवस आधीच्या सत्रात भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बँकिंग, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र खरेदी दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४३६.१३ लाख कोटी रुपये झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात ४३४.८६ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.२७ लाख कोटींची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये चढउतारआजच्या व्यवहारात BSE वर एकूण ४०११ शेअर्सची खरेदी-विक्री झाली. ज्यामध्ये २८९२ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १०४० शेअर्स तोट्यासह बंद झाले. ७९ शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १२ शेअर्स वाढीसह आणि १८ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह आणि ३१ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी १.९२ टक्के, इंडसइंड बँक १.७७ टक्के, अदानी पोर्ट्स १.४७ टक्के, आयटीसी ०.७२ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.७१ टक्के, एलअँडटी ०.६८ टक्के, टायटन ०.४० टक्के, एचयूएल ३.०८ टक्के, रिलायन्स ०.३७ टक्के वाढीसह बंद झाले. तर इन्फोसिस २.०१ टक्के, आयसीआयसीआय बँक १.५२ टक्के, कोटक बँक १.३२ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.२८ टक्के, एसबीआय १.२३ टक्के घसरणीसह बंद झाले.