Join us

Ixigo IPO: ट्रॅव्हल कंपनी इक्झिगोचा १० जूनला IPO येणार; किती असेल प्राईज बॅन्ड, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 1:13 PM

Ixigo IPO: ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोची मूळ कंपनी ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजीचा आयपीओ १० जून रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. पाहा कधी करु शकता गुंतवणूक आणि किती आहे प्राईज बॅन्ड.

Ixigo IPO: ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोची (Ixigo) मूळ कंपनी ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजीचा (Le Travenues Technology) आयपीओ १० जून रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर ८८ ते ९३ रुपये प्राइस बॅन्ड निश्चित केला आहे. इक्सिगोचा आयपीओ १० ते १२ जून दरम्यान गुंतवणूकीसाठी खुला असेल. गुंतवणुकदारांसाठी हा इश्यू ७ जून या ट्रेडिंग डेला खुला होईल. कंपनी आपल्या आयपीओमध्ये १२० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. त्याचबरोबर कंपनीचे विद्यमान भागधारक आणि गुंतवणूकदार यांच्याकडून सुमारे ६.६७ कोटी शेअर्सचं ऑफर फॉर सेल (OFS) आणलं जाणार आहे. अपर प्राईज बॅन्डवर या शेअर्सची एकूण किंमत सुमारे ६२० कोटी रुपये असेल. आयपीओचा एकूण आकार ७४० कोटी रुपये असेल. 

ऑफर-फॉर-सेलद्वारे (OFS) आपले शेअर्स विकणाऱ्या इक्सिगोच्या भागधारकांमध्ये सैफ पार्टनर्स इंडिया IV, पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट व्ही, आलोक बाजपेयी, रजनीश कुमार, मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स, प्लासिड होल्डिंग्स, कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप आणि मॅडिसन इंडिया कॅपिटल एचसी यांचा समावेश आहे. 

सैफ पार्टनर्स आणि पीक एक्सव्ही यांचा कंपनीत अनुक्रमे २३.३७ टक्के आणि १५.६६ टक्के हिस्सा आहे आणि ते कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहेत. इक्सिगो ही टेक आधारित ट्रॅव्हल कंपनी आहे जी रेल्वे, हवाई, बस आणि हॉटेल्स बुक करण्यावर आणि प्रवासाचा प्लान बनविण्यावर लक्ष केंद्रित करते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीला २३.४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला, तर मागील वर्षी कंपनीला २१.०९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग नफा ३२ टक्क्यांनी वाढून ५०१.३ कोटी रुपये झाला आहे. 

नफ्यात झाली वाढ 

आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत इक्सिगोचा निव्वळ नफा २५२.१ टक्क्यांनी वाढून ६५.७ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीचा महसूल ३४.८ टक्क्यांनी वाढून ४९१ कोटी रुपये झाला आहे. अॅक्सिस कॅपिटल, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स आणि जेएम फायनान्शिअल या कंपन्यांनी या इश्यूचे लीड मॅनेजर म्हणून काम केले आहे. 

(टीप: यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक