Join us

'या' कंपनीला आधीच लागलेली कुणकूण? Paytm Crisis सुरू होण्यापूर्वीच विकले होते शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 10:09 AM

रिझर्व्ह बँकेच्या कठोर कारवाईमुळे पेटीएमच्या शेअर्सना मोठा झटका बसला आणि अवघ्या तीन दिवसांत शेअर्स ४२ टक्क्यांनी घसरले.

Paytm Crisis: रिझर्व्ह बँकेच्या कठोर कारवाईमुळे पेटीएमच्या शेअर्सना मोठा झटका बसला आणि अवघ्या तीन दिवसांत शेअर्स ४२ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, सॉफ्टबँक या धक्क्यातून वाचली आहे, कारण रिझर्व्ह बँकेच्या कारवाईपूर्वी त्यांनी आपला मोठा हिस्सा विकला होता. सॉफ्टबँक समूहाच्या व्हिजन फंडाचे कार्यकारी व्यवस्थापकीय भागीदार नवनीत गोविल यांनी ही माहिती दिली. 

आता प्रश्न असा पडतो की सॉफ्टबँक समूहाला याची पूर्वसूचना मिळाली होती का आणि उर्वरित भागभांडवलांचं काय होणार? रिझर्व्ह बँकेनं २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पेटीएमच्या शेअर्सनाही त्याचा फटका बसत आहे. 

SoftBank Group समूहाला लागलेली का कुणकूण? 

टेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या जपानी गुंतवणूकदारांनी भारतातील नियामक वातावरणाबाबत अनिश्चितता समजली होती असं दिसून येत आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हा खुलासा व्हिजन फंडचे कार्यकारी व्यवस्थापकीय भागीदार नवनीत गोविल यांनी केला आहे. नवनीत यांच्या मते, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या परवान्याबाबत अनिश्चितता होती. अशा स्थितीत व्हिजन फंडाच्या फायनान्स प्रमुखांनी सांगितलं की, "यामुळे शेअर्सची तातडीनं विक्री करण्याची गरज भासू लागली आणि आता शेअर्समध्ये झालेली घसरण पाहता शेअर्सची विक्री करून योग्यच केल्याचं दिसतं." मात्र, नवनीत यांनी पेटीएममधील सॉफ्टबँकच्या उर्वरित स्टेकबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 

सातत्यानं हिस्सा केला कमी 

नोव्हेंबर २०२२ पासून सॉफ्टबँक नियमितपणे पेटीएममधील आपला हिस्सा कमी करत आहे आणि ही हिस्सा कमी करण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यापर्यंत सुरू होती. गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये पेटीएममधील सॉफ्टबँकेचा हिस्सा सुमारे ५ टक्के होता. पेटीएमनं २०२१ मध्ये आयपीओसाठी दाखल केलेल्या मसुद्यानुसार, त्यात सॉफ्टबँकचा १८.५ टक्के हिस्सा होता.

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँक