PVR Shares: शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' आज रिलीज झाला. जवानच्या रिलीजमुळे PVR आयनॉक्सच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 'जवान'च्या पहिल्या दिवशी 75 कोटी रुपयांची कमाई करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळेच पीव्हीआर आयनॉक्सच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करून माहिती दिली होती की, पीव्हीआर आयनॉक्समध्ये 4.48 लाख अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे, तर सिनेपोलिसची 1.09 लाख तिकिटे बुक झाली आहेत. तरण आदर्शने आज कमाईबद्दल ट्विट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवानद्वारे पीव्हीआर आयनॉक्सने 15.60 कोटी रुपये आणि सिनेपोलिसमध्ये 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पीव्हीआर आयनॉक्सचे शेअर्स वधारले
जवानच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्सच्या आकडेवारीनुसार, दुपारी 1:50 वाजता शेअरची किंमत 1.20 टक्क्यांच्या वाढीसह 1849.25 रुपयांवर व्यवहार करत आहे, म्हणजेच सुमारे 22 रुपये. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 1869 रुपयांवर पोहोचले होते.
35 मिनिटांत 400 कोटींची वाढ
दुपारी 12 वाजता PVR आयनॉक्सने जवानच्या तिकिट विक्रीतून 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा आकडा 35 ते 40 कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. यामुळेच शेअर मार्केटमध्ये पीव्हीआर आयनॉक्सने अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सकाळी 9.50 वाजता कंपनीच्या शेअरने 1869 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. त्यावेळी पीव्हीआर आयनॉक्सचे मार्केट कॅप 18,267.71 कोटी रुपये होते. एक दिवस आधी बाजार बंद झाला तेव्हा मार्केट कॅप 17,860.13 कोटी रुपये होते. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या 35 मिनिटांत 407.58 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.