Join us  

५ वर्षांत १ लाखाचा टप्पा? शेअर मार्केट करणार विक्रमी कामगिरी; परदेशी फर्मची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 1:12 PM

Share Market News: भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक १ लाखांचा टप्पा पार करू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

Share Market News: गेल्या काही दिवासांपासून शेअर मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटने नवा विक्रमी टप्पा पार केलेला नाही. जगातील अनेकविध कारणांचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. यातच आता एका परदेशी कंपनीने मोठा दावा केला आहे. शेअर मार्केट पुढील ५ वर्षांत तब्बल १ लाखाचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजचे प्रमुख क्रिस वूड यांनी भारतीय शेअर बाजाराविषयी ही भविष्यवाणी केली आहे. बीएसई निर्देशांक येत्या पाच वर्षांत १ लाखाचा टप्पा गाठेल, असा दावा त्यांनी केला. त्यासाठी EPS मध्ये १५ टक्के वाढ होईल. एक वर्षांच्या प्रगतीचा आलेख पाहता PE १९.८ पटीने वाढेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. या गृहितकावर त्यांनी ही एक लाख स्तर गाठण्याचे गणित मांडले आहे.

गुंतवणूकदारांचा ओढा कायम राहील

रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीने पुढील काही वर्षे भारतीयांना दिलासा दिला तर मोठा बदल होऊ शकतो. भारतीय कंपन्यांच्या शॉर्ट टर्म मूल्यांमध्ये घसरण होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा कायम राहील. इतर परदेशी बाजारांपेक्षा भारतीय बाजार स्वस्त आहेत. त्यामुळे या बाजारात गुंतवणूकदारांना फायदा होईल, असे त्यांना वाटते. शेअर बाजारात सलग दोन दिवस तेजीचे सत्र दिसून आले. 

दरम्यान, भारताच्या देशांतर्गत मालमत्ता व्यवस्थापनाची स्थिती देखील चांगली आहे. वुडच्या मते, मार्च अखेरीस ११.१ लाख कोटी रुपयांच्या घरगुती मालमत्तेपैकी अंदाजे ४.७ टक्के इक्विटीचा वाटा होता. देशांतर्गत इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये ओघ सुरूच आहे, ज्यामध्ये SIP मोठे योगदान देतात. चलनविषयक धोरणाच्या कठोरपणामुळे भारतीय शेअर बाजाराच्या अलीकडे मजबूत होण्याचे मुख्य कारण एसआयपी आहे. गेल्या १२ महिन्यांत सरासरी मासिक SIP योगदान १३,१५० कोटी रुपये आहे.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार