Jet Airways Share: जेट एअरवेजचे शेअर्स आज बुधवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये होते. आज कंपनीच्या शेअर्सला 5% चं अपर सर्किट लागलं आणि त्याची किंमत 44.92 रुपयांवर पोहोचली. याआधी मंगळवारी देखील हा शेअर 5% च्या अपर सर्किटवर आला होता आणि तो 42.79 रुपयांवर बंद झाला होता. शेअर्सच्या या वाढीमागे एक चांगली बातमी आहे. खरंतर, खासगी क्षेत्रातील विमान कंपनी जेट एअरवेजच्या रिझॉल्युशन प्लान राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणानं (NCLAT) कायम ठेवला आहे. NCLAT ने मंगळवारी जेट एअरवेजची मालकी जालान कॅलरॉक समूहाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली.
काय आहे तपशील?
NCLAT खंडपीठाने जेट एअरवेजच्या देखरेख समितीला ९० दिवसांत मालकी हस्तांतरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, खंडपीठानं जेट एअरवेजच्या कर्जदारांना परफॉर्मन्स बँक गॅरंटीच्या स्वरूपात समूहानं दिलेले १५० कोटी रुपये समायोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
जेट एअरवेजला कर्ज देणारी वित्तीय संस्था आणि यशस्वी बोली लावणारी जालान कॅलरॉक कोलिशन (JKC) यांच्यात बंद एअरलाइनच्या व्यवस्थापनाच्या हस्तांतरणावरून एका वर्षाहून अधिक काळ कायदेशीर वाद सुरू आहे. यापूर्वी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाला (एनसीएलएटी) या विषयावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. जेट एअरवेजचं कामकाज एप्रिल २०१९ पासून बंद आहे.
१३०० वर होता शेअर?
गेल्या दोन ट्रेडिंग दिवसांमध्ये जेट एअरवेजच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे सातत्यानं नुकसान झालंय. २००५ मध्ये तो १३०० रुपयांच्या पुढे गेला होता. त्यानुसार आत्तापर्यंत त्यात ९९ टक्क्यांची घट झाली आहे. शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ७५.२९ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ३५.५५ रुपये आहे.(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)