Join us

'या' IPO नं दिला गुंतवणूकदारांना झटका, खराब लिस्टिंग; पहिल्याच दिवशी पैसे बुडाले, ₹२०१ वर आला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:28 AM

कंपनीचे शेअर्स आज बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. शेअर्सच्या लिस्टिंगनं गुंतवणूकदारांना झटका बसला.

JG Chemicals IPO Listing Today: जेजी केमिकल्सचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स आज बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. जेजी केमिकल्सच्या शेअर्सच्या लिस्टिंगनं गुंतवणूकदारांना झटका बसला. कंपनीचं शेअर्स बीएसईवर 4.52% च्या डिस्काऊंटसह 211 रुपयांवर लिस्ट झाले. त्याच वेळी, हा शेअर NSE वर 209 रुपयांवर लिस्ट झाला. ही किंमत आयपीओच्या किमतीपेक्षा 5.43 टक्क्यांनी कमी आहे. जेजी केमिकल्सच्या आयपीओची किंमत 210-221 रुपये प्रति शेअर होती. लिस्ट झाल्यानंतर, हा शेअर बीएसईवर 9 टक्क्यांनी घसरला आणि 201 रुपयांवर पोहोचला.  

जेजी केमिकल्सच्या आयपीओला तीन दिवसांच्या बोली प्रक्रियेदरम्यान उत्तम प्रतिसाद मिळाला होता. कंपनीचा आयपीओ एकूण 27.78 पट सबस्क्राईब झाला. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठीचा राखीव कोटा 46.33 पट सबस्क्राईब झाला होता, तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा राखीव कोटा 32.09 पट सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला हिस्सा 17.44 पट सबस्क्राईब झाला. कोलकातास्थित झिंक ऑक्साईड कंपनीनं सुरुवातीच्या भागविक्रीतून 251.19 कोटी रुपये उभारले होते. यामध्ये 165 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स आणि 39,00,000 शेअर्सच्या ओएफएसचा समावेश आहे. 

कंपनीच्या बाबत माहिती 

जेजी केमिकल्सची स्थापना 1975 मध्ये झाली आणि ती भारतात 80 पेक्षा जास्त ग्रेड झिंक ऑक्साईड तयार करते. त्याच्या उत्पादनांमध्ये सिरॅमिक्स, पेंट्स आणि कोटिंग्ज, फार्मा आणि सौंदर्यप्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅटरी, ॲग्रोकेमिकल्स, खतं, विशेष रसायनं, वंगण, तेल आणि गॅस तसंच पशुखाद्य यासह अन्य बाबींचा समावेश आहे.(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक