शेअर बाजारात आज झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील नजारा टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. तिमाहीचा रिझल्ट समोर आल्यानतंर, नजारा टेक्नॉलॉजीज (Nazara Technologies) स्टॉक 6.5 टक्क्यांच्या उसळीसह बुधवारी 651 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 31 टक्क्यांनी वाढला आहे.
डिसेंबर तिमाहीत नजारा टेक्नॉलॉजीजचा नेट प्रॉफिट यावेळी 22.4 कोटी रुपये होता. तसेच गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत नेट प्रॉफिट 17.1 कोटी रुपये होता. या तिमाहिचे परिणाम समोर आल्यानंतर, कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतल्याचे दिसून आले आहे. कंपनी रेव्हेन्यू चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही दरम्यान 314.80 कोटी रुपये होता. जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीदरम्यान 185.80 कोटी रुपये होता. यानुसार कंपनीचा रेव्हेन्यू 70 टक्क्यांनी वाढला आहे.
स्टॉक मार्केटमध्ये नजारा टेक्नॉलॉजीजची कामगिरी -
गेल्या एक महिन्यादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तसेच, 6 महिन्यांपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी करून ते होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 14 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा मिळाला आहे. कंपनीची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी, 1188 रुपये एवढी आहे. तसेच, निचांकी पातळी 475.05 रुपये एवढी आहे.
रेखा झुनझुनवाला यांचा किती आहे वाटा? -
Tredlyne च्या डाटानुसार, डिसेंबर तिमाहीपर्यंत या कंपनीतील रेखा राकेश झुनझुनवाला यांचा एकूण वाटा 10 टक्के एवढा होता. अर्थात त्यांच्याकडे कंपनीचे 65,88,620 शेअर होते. तसेच, दोन्ही प्रमोटर्सकडे मिळून 19.1 टक्के हिस्सेदारी होती.