टाटा मोटर्सच्या शेअर्सनं 9 जानेवारी रोजी कामकाजादरम्यान 809 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीच्या लक्झरी कार डिव्हिजन जॅग्वार लँड रोव्हरनं (JLR) ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. डिसेंबर तिमाहीत, JLR ने मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 27 टक्के अधिक वाहनांची विक्री केली. या बातमीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला.
मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार आहे की, जेएलआरची कामगिरी अशीच सुरू राहिल्यास, हे युनिट टाटा मोटर्सच्या रेटिंगमधील बदलाचे मुख्य कारण बनू शकते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) कंपनीचे शेअर्स दुपारी 1:38 वाजता 1.78 टक्क्यांच्या वाढीसह 803.15 रुपयांवर व्यवहार करत होते.
या ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या शेअर्सला ओव्हरवेट रेटिंग दिलं आहे आणि त्याचे टार्गेट प्राईज 890 रुपये निश्चित केली आहे. याचा अर्थ कंपनीचे शेअर्स सध्याच्या पातळीपेक्षा 10 टक्क्यांनी वर जाऊ शकतात. गेल्या महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली, तर या काळात निफ्टी ऑटो इंडेक्स 4 टक्क्यांनी वाढला.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये आत्तापर्यंत जेएलआरचा होलसेल वॉल्यूम 2.9 लाख युनिट्स आहे, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 28 टक्क्यांनी अधिक आहे. सर्व क्षेत्रांमध्ये वार्षिक आधारावर रिटेल वॉल्यूमदेखील चांगला आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या तज्ज्ञांनी कंपनीच्या शेअर्सना बाय रेटिंग दिले आहे आणि त्यासाठी 900 रुपये टार्गेट प्राईज निश्चित केली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरी विषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)