Join us

JP Group Share Price : ९६% आपटून १२ रुपयांवर आला JP Groupचा 'हा' शेअर, महिन्याभरात ३६ टक्क्यांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 12:21 PM

JP Group Share Price :कंपनीचे शेअर्स सातत्यानं घसरत आहेत. बुधवारी कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी घसरून ११.९९ रुपयांवर आला. जेपी असोसिएट्सच्या शेअरमध्येही मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली.

JP Group Share Price : जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडचे (जेपी असोसिएट्स) शेअर्स सातत्यानं घसरत आहेत. बुधवारी कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी घसरून ११.९९ रुपयांवर आला. जेपी असोसिएट्सच्या शेअरमध्येही मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडविरोधात आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची दिवाळखोरी याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणानं (NCLT)  ३ जून रोजी स्वीकारली आहे. जेपी असोसिएट्सचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास ९६ टक्क्यांनी घसरलेत. 

१२ रुपयांवर आला शेअर 

जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडच्या (जेपी असोसिएट्स) शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत मोठी घसरण झाली आहे. ११ जानेवारी २००८ रोजी कंपनीचा शेअर २९७.६० रुपयांवर होता. जेपी असोसिएट्सचा शेअर ५ जून २०२४ रोजी ११.९९ रुपयांवर आला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ९६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या १ महिन्यात जेपी असोसिएट्सचे शेअर्स जवळपास ३६ टक्क्यांनी घसरलेत. ६ मे २०२४ रोजी कंपनीचा शेअर १८.७२ रुपयांवर होता, जो ५ जून २०२४ रोजी ११.९९ रुपयांवर आला आहे. कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीशी संबंधित आमच्या गणनेत आम्ही जेपी असोसिएट्सनं दिलेल्या बोनस शेअर्सचा समावेश केलेला नाही. 

कंपनीवर २९३६१ कोटी रुपयांचं कर्ज 

जेपी असोसिएट्सवरील एकूण २९३६१ कोटी रुपयांच्या कर्जामुळे आयसीआयसीआय बँकेनं (ICICI Bank) २०१८ मध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) २०२२ मध्ये या प्रक्रियेत सहभागी झाली. जयप्रकाश असोसिएट्सवर १७ हजार ७०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्याजासह हे कर्ज २९३६१ कोटी रुपये झालंय. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमनं जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे. कन्सोर्टियममध्ये २२ कर्जदारांचा समावेश आहे. नुकतीच घसरण झाली असली तरी जयप्रकाश असोसिएट्सचे शेअर्स गेल्या चार वर्षांत जवळपास ७०५ टक्क्यांनी वधारले होते. जेपी असोसिएट्सचा शेअर ५ जून २०२० रोजी १.४९ रुपयांवर होता. ५ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर ११.९९ रुपयांवर पोहोचलाय. 

(टीप: यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक