Kalpataru Ltd : तुम्ही जर आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आता चांगली संधी चालून आली आहे. रिअॅल्टी डेव्हलपर कल्पतरू लिमिटेडला (Kalpataru Ltd) त्याच्या पहिल्या इक्विटी शेअर विक्रीसाठी SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. कंपनी आयपीओद्वारे १५९० कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहे. या निधीतून कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांद्वारे घेतलेल्या विशिष्ट कर्जाच्या पूर्ण किंवा आंशिक परतफेडीसाठी, पूर्व-पेमेंटसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरणार असल्याची माहिती दिली आहे.
कंपनीने १४ ऑगस्ट रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला होता. कल्पतरू लक्झरी, प्रीमियम आणि मध्यम उत्पन्न निवासी, व्यावसायिक आणि रिटेल प्रकल्प, इंटीग्रेटेड टाउनशिप, लाइफस्टाइल गेट्ड कम्युनिटी आणि पुनर्विकास यांच्या विकासावर काम करते. मार्चच्या अखेरीस, कल्पतरूच्या चालू प्रकल्पांमध्ये अंदाजे २२.०२ दशलक्ष चौरस फूट विकसित करण्यायोग्य क्षेत्राचा समावेश होता. त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये अंदाजे १९.९३ दशलक्ष चौरस फूट विकसित करण्यायोग्य क्षेत्र समाविष्ट आहे. २०२५, २०२६ आणि २०२७ या आर्थिक वर्षांमध्ये विविध टप्प्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीचे बहुतांश प्रकल्प मुंबई महानगर आणि पुणे येथे आहेत. तर हैदराबाद आणि नोएडा येथे देखील २ प्रकल्प चालू आहेत. एक आगामी प्रकल्प नागपुरात आहे. तर सुरत, नागपूर आणि उदयपूर येथे आरक्षित जमीन आहे.
मार्चअखेरपर्यंत, कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांचे मुंबई, ठाणे, पनवेल आणि पुणे, हैदराबाद, इंदूर, बेंगळुरू आणि जोधपूर येथे एकूण ११३ पूर्ण झालेले प्रकल्प होते, ज्यांचे एकूण क्षेत्र २४.१० दशलक्ष चौरस फूट आहे. आयसीआयसीआय सिक्योरिटीज लिमिटेड, जेएम फाइनेन्शियल लिमिटेड आणि नोमुरा फाइनेन्शियल एडव्हायजरी अँड सिक्योरिटीज (इंडिया) प्राइवेट लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.