इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या व्यवसायातील कंपनी कायनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा स्टॉक मंगळवारी म्हणजेच 22 नोव्हेंबर 2022 रोजी सूचीबद्ध झाला आहे. कायनस टेक्नॉलॉजीचा शेअर 775 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. हे इश्यू किमतीपेक्षा 188 रुपये जास्त आहे. याचा अर्थ हा शेअर इश्यू किमतीच्या 32.03 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध आहे. या IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसंच यावर तज्ज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तजज्ञांनी दीर्घ कालावधीसाठी सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला. 858 कोटी रुपयांचा हा IPO 34 पट सबस्क्राइब होता.
ही कंपनी संरक्षण क्षेत्रात काम करते. आयपीओ मार्केटकडे पाहिल्यास डिफेन्स शेअर्सच्या लिस्टिंगवर चांगले रिटर्न्सही मिळाले आहेत. सूचीबद्ध झाल्यानंतर डिफेन्स शेअर्सनं 185 टक्क्यांपर्यंत रिटर्नही दिले आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये पारस डिफेन्स ही कंपनी सूचीबद्ध झाली होती. कंपनीचे शेअर्स 185 टक्के प्रीमिअमवर सूचीबद्ध झाले होते. आतापर्यंत त्या शेअर्सनं 243 टक्क्यांचे रिटर्न दिले. याशिवाय 15 मार्च 2021 रोजी MTAR Tech या कंपनीचे शेअर्स 88 टक्के प्रीमिअमवर सूचीबद्ध झाले होते. या शेअर्सनं आजवर 167 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.
ग्रे मार्केटमध्येही उत्तम प्रतिसादकायनस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सना ग्रे मार्केटमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याची किंमत सातत्यानं वाढत होती. कायनस टेक्नॉलॉजीचा जीएमपी जवळपास 125 रुपये होता. या कंपनीकडे 30 वर्षांपेक्षाही अधिक अनुभव आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरची माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)