Join us  

इंजिनिअरिंग कंपनीला मिळालं ₹१०१२ कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणुकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 1:33 PM

बुधवारी या इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.

KEC International Ltd Order: बुधवारी केईसी इंटरनॅशनल लिमिटेड या इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. कंपनीचे शेअर्स 11.23 टक्क्यांनी वाढून 739 रुपयांच्या नव्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठी ऑर्डर मिळाल्याचं वृत्त आहे. केईसी इंटरनॅशनल लिमिटेडला मंगळवारी 1,012 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीला व्यवसाय पोर्टफोलिओच्या विविध सेक्टर्समध्ये 1,012 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या असल्याची माहिती केईसी इंटरनॅशनल लिमिटेडनं मंगळवारी दिली. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगनुसार, कंपनीच्या सिव्हिल बिझनेस डिव्हिजननं भारतातील डेटा सेंटर आणि एफएमजीसी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळवल्या आहेत.

यामध्ये पश्चिम भारतात डेटा सेंटर उभारणं आणि प्रसिद्ध जागतिक एफएमजीसी कंपनीसाठी दक्षिण भारतात उत्पादन युनिट उभारण्याचा समावेश आहे. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन (T&D) सेगमेंटनं भारत आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रकल्प मिळवले आहेत. यामध्ये विद्यमान खाजगी ग्राहकांकडून भारतातील 765 kV ट्रान्समिशन लाइनसाठी ऑर्डर तसंच अमेरिकेतील टॉवर, हार्डवेअर आणि पोल्सचा पुरवठा यांचा समावेश आहे. केईसी इंटरनॅशनलच्या केबल डिव्हिजननं भारतात आणि परदेशात विविध प्रकारच्या केबल्सच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळवल्या आहेत.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक