Join us

Kotak Mahindra Bank : RBI ची एक कारवाई उदय कोटक यांना पडली महागात, बसला १०,३२८ कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 9:40 AM

Kotak Mahindra Bank : देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गुरुवारी सुमारे १२ टक्क्यांनी घसरले. यानंतर उदय कोटक यांनाही कोट्यवधींचा फटका बसला.

Kotak Mahindra Bank : देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गुरुवारी सुमारे १२ टक्क्यांनी घसरले. बुधवारी, आरबीआयनं बँकेला ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास आणि तत्काळ प्रभावानं क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. त्याचा परिणाम गुरुवारी बँक शेअर्सवर दिसून आला. बीएसईवर कंपनीचे शेअर १०.८५ टक्क्यांनी घसरून १,६४३ रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंग दरम्यान शेअर १२.१० टक्क्यांपर्यंत घसरून १,६२० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला. त्याचप्रमाणे, एनएसईवर देखील कंपनीचे शेअर्स १०.७३ टक्क्यांनी घसरले आणि १,६४५ रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंग दरम्यान शेअर १३ टक्क्यांपर्यंत घसरून १,६०२ रुपयांवर आला होता. ही शेअरची वर्षातील नीचांकी पातळी आहे. 

शेअर्समध्ये मोठी घसरण 

शेअर्समधील घसरणीमुळे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि गैर-कार्यकारी संचालक उदय कोटक यांच्या निव्वळ संपत्तीत मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गुरुवारी त्यांची एकूण संपत्ती १.२४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १०,३२८ कोटी रुपयांनी घसरली. त्यांची एकूण संपत्ती आता १३.१ अब्ज डॉलर्स झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते १५५ व्या स्थानावर घसरले आहेत. या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत १.५२ अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँकेत २५.७१ टक्के भागीदारी आहे. तसंच शेअर्सच्या घसरणीमुळे बँकेचं मार्केट कॅप ३९,७६८.३६ कोटी रुपयांनी घसरून ३,२६,६१५.४० कोटी रुपयांवर आलं.. बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी कंपनीचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

 

अॅक्सिस बँक गेली पुढे 

यासह ॲक्सिस बँक ही कोटक महिंद्रा बँकेला मागे टाकून बाजार मूल्याच्या बाबतीत देशातील चौथी सर्वात मौल्यवान बँक बनली आहे. ॲक्सिस बँकेचा एमकॅप ३,४८,०१४.४५ कोटी रुपये होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बाजार भांडवलानुसार तीन सर्वात मौल्यवान बँका आहेत.  

आयटी नियमांचं वारंवार पालन न केल्याबद्दल कठोर कारवाई करत, आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास आणि त्वरित प्रभावानं नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातली होती. रिझर्व्ह बँकेला बँकेच्या आयटी जोखीम व्यवस्थापनात 'गंभीर उणिवा' आढळल्या.

 

टॅग्स :शेअर बाजारबँक