Larsen & Toubro share: मजबूत तिमाही निकालानंतर इन्फ्रा कंपनी लार्सन अँड टुब्रोच्या (एल अँड टी) शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या शेअरमध्ये आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सुमारे सात टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रीच्या मोडमध्ये असताना कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.
लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचा शेअर गुरुवारी व्यवहारादरम्यान ३६३७ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३,९४८.६० रुपये आहे. ३ जून २०२४ रोजी या शेअरनं हा स्तर गाठला. नोव्हेंबर २०२३ मध्ये शेअरची किंमत २,८७२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होती.
काय म्हणाले एक्सपर्ट?
"आम्ही ४३०० रुपयांच्या (यापूर्वी ४१००) नव्या टार्गेट प्राईजसह यावर खरेदीचा सल्ला कायम ठेवत आहोत," अशी प्रतिक्रिया ब्रोकरेज एमके ग्लोबलनं दिली. इनफ्लो आणि महसुलात अंदाजापेक्षा अधिक वाढ झाली आहे. परंतु मार्जिन १०.३ टक्क्यांपेक्षा कमी आहे, असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे नुवामानं यासाठी ४००० रुपयांचं टार्गेट प्राईज ठेवलंय.
कंपनीचे तिमाही निकाल
लार्सन अँड टुब्रोचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत ५ टक्क्यांनी वाढून ३,३९५ कोटी रुपये झाला आहे. उत्पन्न वाढल्यानं कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३,२२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचे उत्पन्न वाढून ६२,६५५.८५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ५२,१५७.०२ कोटी रुपये होतं. सप्टेंबर तिमाहीत खर्च वाढून ५७,१००.७६ कोटी रुपये झालाय, जो गेल्या वर्षी ४७,१६५.९५ कोटी रुपये होता.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)