LIC investment in Adani Group: सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. गेल्या 2 वर्षांत LIC ने अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या 7 पैकी 4 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक अनेक पटींनी वाढवली आहे. सध्या एलआयसीची ही गुंतवणूक 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
कोणत्या कंपनीत LIC ची किती गुंतवणूक?
आपण सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, LIC ची अदानी ग्रुप कंपन्यांमधील गुंतवणूक (LIC Share Holding in Adani Group Companies) वेगाने वाढली आहे. 1 डिसेंबर 2022 पर्यंत, अदानी समूहाच्या 7 सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 18.98 लाख कोटी रुपये आहे. तर, एलआयसीचे शेअरहोल्डिंग 74,142 कोटी रुपये आहे. हे अदानी समूहाच्या एकूण एमकॅपच्या 3.9 टक्के आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, समूहाच्या अदानी टोटल गॅसमध्ये एलआयसीची हिस्सेदारी 6 पटीने वाढली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ही हिस्सेदारी 1 टक्क्यांपेक्षा कमी होती तर सप्टेंबर 2022 पर्यंत 5.77 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तसेच, अदानी एंटरप्रायझेसमध्ये एलआयसीचा हिस्सा 4.02 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 1.5 टक्क्यांवर गेला आहे. हा पूर्वी 1 टक्क्यांपेक्षा कमी होता. अदानी ट्रान्समिशनमध्ये हिस्सा 2.42 टक्क्यांवरून 3.36 टक्के झाला आहे. अदानी पोर्ट्स ही एकमेव कंपनी आहे ज्यामधील शेअरहोल्डिंग 9.61 टक्के आहे. उर्वरित कंपन्यांमध्ये एलआयसीची हिस्सेदारी 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
एलआयसीच्या शेअरहोल्डिंगमध्ये 10 पट वाढ झाली
गेल्या 2 वर्षात LIC ची अदानी समूहातील कंपन्यांमधील भागीदारी 10 पट वाढली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये ही फक्त 7,304 कोटी रुपये होती. ही हिस्सेदारी आता 74,142 कोटी रुपये झाली आहे. जून 2022 च्या आकडेवारीनुसार, LIC च्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 9.3 लाख कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.