Join us

LIC नं सरकारला दिला ₹२,४४१ कोटींचा डिविडंड, वर्षभरात शेअरमध्ये ७०% ची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 12:19 PM

भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) भारत सरकारला डिविडंड म्हणून २,४४१ कोटी रुपये दिले आहेत.

भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) भारत सरकारला डिविडंड म्हणून २,४४१ कोटी रुपये दिले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयानं शुक्रवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. "अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी २,४४१.४४ कोटी रुपयांचा डिविडेंडचा चेक दिला," असं यात नमूद करण्यात आलंय. वित्त सचिव विवेक जोशी यांच्या उपस्थितीत हा चेक अर्थमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला. 

दरम्यान, शुक्रवारी एनएसईवर एलआयसीचा शेअर ०.६९ टक्क्यांच्या वाढीसह १,०२९.९० रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ८.९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या ६ महिन्यांत त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे ५६.३८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात एलआयसीनं ७१.३४ टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. 

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अलीकडच्या काळात एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे डिसेंबर तिमाहीचे मजबूत निकाल आणि बाजारात त्यांची मजबूत उपस्थिती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एलआयसीचे शेअर्स डिस्काऊंटवर काम करत होते, जेव्हा इंडस्ट्री पीई २ च्या मल्टिपल वर होते. 

 

काय म्हटलेय तज्ज्ञांनी? 

“एलआयसीनं ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला, ज्याला शेअर बाजाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला स्टॉकनं पॉझिटिव्ह रिअॅक्शन देत जवळजवळ ६ टक्क्यांची झेप घेतली. उत्तम कामगिरीसह एलआयसी एम्बेडेड व्हॅल्यूवर (EV) मोठ्या सवलतीने व्यापार करत होते, अशी प्रतिक्रिया बोनान्झा पोर्टफोलिओचे रिसर्च अॅनालिस्ट ओंकार कामटेकर यांनी दिली. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारनिर्मला सीतारामनशेअर बाजार