Tata Group Stock: शेअर बाजारात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ५.२९ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं. बीएसई सेन्सेक्स ८२०.९७ अंकांनी घसरून ७८,६७५.१८ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५७.८५ अंकांनी घसरून २३,८८३.४५ अंकांवर बंद झाला. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) टाटा समूहाच्या टाटा पॉवर (Tata Power) कंपनीतील २.०२ टक्क्यांहून अधिक हिस्सा सुमारे २,८८८ कोटी रुपयांना विकला. टाटा पॉवरमधील एलआयसीचा हिस्सा आता ३.८८ टक्क्यांवर आला आहे. सोमवारी व्यवहाराअंती टाटा पॉवरचा शेअर ४ टक्क्यांनी घसरून ४१४.२५ रुपयांवर बंद झाला.
का झाली घसरण?
बीएसई सेन्सेक्स मंगळवारी कामकाजादरम्यान ८०० अंकांनी घसरला. कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल, परकीय गुंतवणूकदारांकडून काढला जाणारा पैसा आणि आशियाई व युरोपीय बाजारपेठेतील कमकुवत कल यामुळे स्थानिक बाजारात घसरण झाली.
Tata Power मधील हिस्सा केला कमी
टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (TPCL) मधील आपला हिस्सा १८,८७,०६,३६७ शेअर्सवरून १२,३९,९१,०९७ शेअर्सवर आणला आहे. हे कंपनीच्या पेड-अप कॅपिटलच्या ५.९० टक्क्यांवरून ३.८८ टक्क्यांवर आलं आहे. हे शेअर्स २० जून २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत खुल्या बाजारात सरासरी ४४६.४०२ रुपये प्रति शेअर दरानं विकले गेले. या किमतीत एलआयसीनं ६.४७ कोटी शेअर्स म्हणजेच २.०२ टक्के हिस्सा २,८८८ कोटी रुपयांना विकला. बीएसईवर एलआयसीचा शेअर ०.३२ टक्क्यांनी वधारून ९२१.४५ रुपयांवर बंद झाला.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)