Join us

LICला अच्छे दिन येणार! ९४० ₹वर शेअर जाणार? गुंतवणूकदारांना लॉटरी लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 9:24 PM

LIC Share Price: LICच्या नफ्यात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे.

LIC Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या उलाढाली होताना दिसत आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसीने शेअर मार्केटमध्ये उडी घेतली, परंतु, गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता एलआयसीच्या शेअरला अच्छे दिन येणार असून, याची किंमत ९४० पर्यंत जाऊ शकते, असा कयास बांधला गेला आहे. 

अलीकडेच LICने चौथ्या तिमाहीचे निकाल घोषित केले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील चौथ्या तिमाहीत कंपनीने पाच पट लाभ मिळविला. कंपनीचा नफा वाढून १३,१९१ कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत LICला २,४०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या कामगिरीमुळे आता एलआयसीच्या शेअरवर सकारात्मक परिणाम दिसत असून, गुंतवणूकादारांचा विश्वास वाढल्याचे बोलले जात आहे.  मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक खरेदीचे रेटिंग दिले आहे. तर Emkayने हा स्टॉक कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अन्य काही ब्रोकर्सनेही हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे.

LIC चा शेअर ९४० ₹वर जाणार?

ब्रोकरेज फर्म जेएम फायनेन्शिअलने LICचा शेअर खरेदीचे रेटिंग दिले आहे. या ब्रोकरेजने हा स्टॉक ९४० रुपयांपर्यंत वाढू शकेल, असा दावा केला आहे. या शेअरमध्ये ५५ टक्क्यांची तेजी दिसून येईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे, Emkay ने LICचा शेअर पोर्टफोलिओत कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या ब्रोकरेज हाऊसने त्यासाठी ६६० रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. ब्रोकरेजनुसार या शेअरमध्ये ९ टक्के वाढ दिसून येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, ब्रोकरेज फर्म एक्सिस कॅपिटलने LICचा शेअर कायम ठेवला. या फर्मने ७२० रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. या फर्मनुसार, स्टॉकच्या सध्याच्या भावात १९ टक्के तेजी दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे,  ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ८३० रुपयांचे टार्गेट सेट केले. या शेअरमध्ये ३७ टक्के तेजी दिसून येईल, असा दावा केला आहे. 

दरम्यान, LICचा संपूर्ण आर्थिक वर्षातील निव्वळ नफा अनेक पटीने वाढला आहे. आता हा ३५,९९७ कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये हा निव्वळ नफा ४,१२५ कोटी रुपये होता, असे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :एलआयसीशेअर बाजार