LIC In Health Insurance: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आरोग्य विमा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एलआयसी आरोग्य विमा कंपनी विकत घेण्याच्या प्रक्रियेत आहे. कंपनीचे सीईओ सिद्धार्थ मोहंती यांनी मंगळवारी, १८ मार्च रोजी ही माहिती दिली. या बातमीदरम्यान एलआयसीचा शेअर वधारला आणि आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी तो १.७० टक्क्यांनी वधारून ७५८ रुपयांवर पोहोचला. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर ७५७.२० रुपयांवर बंद झाला. ३ मार्च रोजी हा शेअर ७१५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तरही आहे.
एलआयसीचा प्लॅन काय?
एलआयसीचे उद्दिष्ट आहे की ३१ मार्चपूर्वी आरोग्य विमा कंपनीच्या अधिग्रहणाला अंतिम रूप देऊन घोषणा केली जाईल. मोहंती यांनी स्पष्ट केलं की, एलआयसी ज्या कंपनीचं अधिग्रहण करणार आहे, त्यात एलआयसीचा बहुसंख्य हिस्सा नसेल. या निर्णयामुळे विमा क्षेत्रात एलआयसीचं अस्तित्व बळकट होण्याची अपेक्षा आहे. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी यापूर्वी आरोग्य विमा क्षेत्रातील कंपनीच्या संभाव्यतेचा उल्लेख केला होता.
प्रीमिअम कलेक्शन वाढलं
अलीकडेच एलआयसीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत ग्रूप अॅन्युअल रिन्युअल प्रीमिअम आणि वैयक्तिक प्रीमियम दोन्हीमध्ये मोठी वाढ नोंदविली आहे. एलआयसीनं सांगितलं की, ग्रूप अॅन्युअल रिन्युअल प्रीमिअममध्ये २८.२९ टक्के आणि वैयक्तिक प्रीमियममध्ये ७.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत एलआयसीचं एकूण प्रीमियम संकलन १.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचलं, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील १.८६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी अधिक आहे.
परंतु वैयक्तिक प्रीमियम संकलन फेब्रुवारी २०२४ मधील ४,८९०.४४ कोटी रुपयांवरून फेब्रुवारी २०२५ मध्ये १.०७ टक्क्यांनी घटून ४,८३७.८७ कोटी रुपये झालं. या कालावधीत ग्रुप प्रीमियम अंतर्गत एकूण ४,८९८ पॉलिसी जारी करण्यात आल्या, जी मागील वर्षीच्या ४३१४ पॉलिसींपेक्षा १३.५३ टक्क्यांनी अधिक आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)