Join us  

Lok Sabha Election 2024 : सेन्सेक्स जाणार का ८०००० पार? आतापर्यंत कशी होती निकालांनंतरची BSE-NSEची कामगिरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 8:28 AM

Lok Sabha Election 2024 : शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले. यानंतर सोमवारी कामकाजादरम्यान, शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. आजपर्यंत निकालांच्या दिवशी कशी होती शेअर बाजाराची कामगिरी, पाहूया.

Lok Sabha Election 2024 : शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले. यानंतर सोमवारी कामकाजादरम्यान, शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी शेअर बाजारातगुंतवणूकदारांना मोठा नफाही मिळाही होता. परंतु यापूर्वी लोकसभा निवडणुकांदरम्यान शेअर बाजाराची कामगिरी कशी होती? याबद्दल माहितीये का? यापूर्वी २०१४ आणि २०१९ ला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता.  

सोमवारी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साही दिसून आले. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी स्तरावर पोहोचल्याचे दिसले. निफ्टी २३००० अंकांच्या तर बीएसई सेन्सेक्स ७६००० अंकांच्या पुढे गेला. एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएचं सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं सोमवारी शेअर बाजारात उत्साह दिसून आला होता. कामकाजा दरम्यान, शेअर बाजारात मोदी स्टॉक्सनंही जोरदार कामगिरी केली होती. सोमवारी शेअर बाजारात तेजी इतकी होती की बीएसईवरील सर्व लिस्टेड कंपन्यांचं बाजार भांडवल जवळपास १२ लाख कोटी रुपयांनी वाढून ४२४ लाख कोटी रुपये झालं. 

मोदी आणि शेअर बाजाराचं कनेक्शन 

लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजाराची कामगिरी यांचा परस्पर संबंध अवाक् करणारा आहे. शेअर बाजाराच्या वाढीशी मोदींचा सखोल संबंध आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निकालाच्या मतमोजणीवेळीही भारतीय निर्देशांकाने विक्रमी उच्चांक गाठला होता. 

 

निकालाच्या दिवशी कशी होती कामगिरी? 

१६ मे २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या बेंचमार्क निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला होता. निवडणुकीच्या निकालांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला होता. २०१४ च्या निकालानंतर उत्साहित झालेल्या बीएसई सेन्सेक्सने प्रथमच २५,००० अंकांची पातळी ओलांडली. दिवसभराच्या व्यवहारात निर्देशांक १,४७० अंकांनी वधारला होता. सेन्सेक्सनं २५,३७५.६३ चा सर्वकालिक उच्चांक गाठला. तर एनएसई निफ्टीनं ७,५०० ची पातळी ओलांडून ७,५६३.५० चा सर्वकालिक उच्चांक गाठला. 

२०१९ ला काय झालेलं? 

लोकसभा निवडणूक २०१९ ला २३ मे रोजी मतमोजणी झाली. मोदी सरकार पुन्हा एकदा निर्णायक विजयाची नोंद करेल, असे संकेत कलांनी दिले होते. बीएसई सेन्सेक्स १,००० अंकांनी वधारला आणि ४०,१२४ च्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला. निर्देशांकानं ४० हजारांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती. निफ्टीनंही १२,००० चा महत्त्वाचा आकडा पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला. 

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाचा दिवस पाहता सेन्सेक्स आणि निफ्टी इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? मंगळवार, ४ जून रोजी ते ऐतिहासिक उच्चांक गाठतील का? उद्या सेन्सेक्स पुन्हा ८०,००० वर जाईल का? हे पाहणं बाकी आहे. परंतु, निकालाच्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो, असं सोमवारच्या ट्रेंडवरून दिसून येत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सेन्सेक्सनं दोन हजारांचा टप्पा ओलांडला आणि निफ्टीने २३ हजारांचा टप्पा ओलांडला होता.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकलोकसभा निवडणूक २०२४नरेंद्र मोदी