Join us  

निवडणूक काळात गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या दीड महिन्यात 26 लाख कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 2:56 PM

लोकसभा निवडणुकीची सुरुवात झाल्यापासून शेअर बाजारातील सेन्सेक्स 3500 अंकांनी वाढला आहे.

Lok Sabha Election Share Market : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याचे ताजे उदाहरण सोमवारी दिसून आले. सकाळी शेअर बाजारात अचानक 500 हून अधिक अंकांची वाढ झाली आणि BSE सेन्सेक्सने 76 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. पण, बाजार बंद होईपर्यंत यात जवळपास 20 अंकांची घसरण झाली. याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 3500 हून अधिक अंकांनी वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी तब्बल 26 लाख कोटी रुपयांची कमाई केली.

BSE आणि NSE मध्ये मोठी वाढलोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला पार पडला, त्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 71,816.46 अंकांवर पोहोचला होता. तर सोमवारी(दि.27) शेअर बाजार 75,390.50 अंकांवर बंद झाला. याचा अर्थ यादरम्यान सेन्सेक्समध्ये एकाच दिवसांत 3,574 अंकांची वाढ झाली. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजारही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी निफ्टी 21,777.65 अंकांवर होता. तर, 27 मे रोजी निफ्टी 22,932.45 अंकांवर बंद झाला. याचा अर्थ तेव्हापासून आतापर्यंत निफ्टीमध्ये सुमारे 1155 अंकांची वाढ झाली आहे. 

गुंतवणूकदारांनी कमावले 26 लाख कोटी पहिल्या टप्प्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांनी तब्बल 26 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुंतवणूकदारांचा नफा आणि तोटा बीएसईच्या मार्केट कॅपशी जोडलेला असतो. बीएसईच्या आकडेवारीनुसार, 19 एप्रिल रोजी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप 3,93,45,528.92 कोटी रुपये होते, जे 27 मे रोजी वाढून 4,19,95,493.34 कोटी रुपये झाले. याचा अर्थ या कालावधीत बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 26.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचाही हा नफा आहे. 

(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक