Lotus Chocolate-Reliance Deal: आताच्या घडीला शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर पडलेले पाहायला मिळत आहे. जगभरातील घडामोडींचा, कोरोनाच्या उद्रेकाचा आणि मंदीच्या शक्यतचे परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. यातच एका कंपनीशी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव जोडले गेल्यानंतर त्या कंपनीचे नशीबच पालटून गेले आहे. गाळात गेलेल्या शेअरला पुन्हा एका नवसंजीवनी मिळाली असून, गेल्या काही सत्रात या शेअरला सलग अप्पर सर्किट लागत आहे.
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने लोटस चॉकलेटमध्ये अतिरिक्त २६ टक्के हिस्सा विकत घेण्याची खुली ऑफर दिली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) या दोन समूह कंपन्यांनी ही ऑफर दिली आहे. यानंतर लोटस कंपनीच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले असून, गुंतवणूकदार सुखावले आहेत.
कंपनीचे बाजार भांडवल २०० कोटींच्या पार पोहोचले
लोटस चॉकलेटचा शेअर १५६.८० रुपयांवर पोहोचला. रिलायन्सच्या दोन्ही कंपन्या लोटस चॉकलेटचे ३३.३८ लाख शेअर्स खुल्या बाजारातून ११५.५० रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीला विकत घेणार आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९८.४५ रुपये तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८१.९० रुपये आहे. कंपनीचे बाजार भांडवल २०० कोटींच्या पार पोहोचले आहे. २९ नोव्हेंबर रोजी लोटस चॉकलेटच्या शेअरची किंमत ११७ रुपयांच्या पातळीवर होती.
रिलायन्ससोबतच्या करारानंतर कंपनीचे शेअर वधारले
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने चॉकलेट कंपनी-लोटस चॉकलेटसोबत मोठा करार जाहीर केला. तेव्हापासून लोटस चॉकलेटच्या शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली. त्यानंतर सातत्याने या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागत आहे. RCPL ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. रिलायन्स रिटेलची प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आहे.
दरम्यान, रिलायन्सने नुकतेच कंपनीतील ५१ टक्के हिस्सा ७४ कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली होती. ऑफरचा एकूण आकार, पूर्णपणे स्वीकारल्यास, ३८.५६ कोटी रुपये असेल. रिलायन्सची खुली ऑफर २१ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ६ मार्चपर्यंत सुरू राहील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"