शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी मोठ्या घसरणीसह झाली. गौतम अदानी यांना लाच आणि फसवणुकीच्या प्रकरणात अमेरिकेच्या न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स जोरदार आपटले. बाजार उघडताच अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसून आलं. सेन्सेक्स-निफ्टीघसरणीसह उघडला आणि त्यानंतर निर्देशांकांत आणखी घसरण झाली. सेन्सेक्स ६१० अंकांच्या घसरणीस ७६,९५० वर तर निफ्टी २०४ अंकांच्या घसरणीसब २३,३१२ अंकांवर व्यवहार करत होता.
देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली तेजी दिसून आली होती, मात्र बंद होण्यापूर्वीच युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यामुळे बाजारानं तेजी गमावल्याचं दिसून आलं. एफआयआयनं मंगळवारी कॅश मार्केटमध्ये ३४०० कोटी रुपयांची विक्री केली होती, परंतु दीर्घ काळानंतर निर्देशांक आणि शेअर फ्युचर्समध्ये ७,१०० कोटी रुपयांची शॉर्ट कव्हर आणि खरेदी देखील केली होती.
अदानी समूहाचे शेअर्स आपटले
गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर २० टक्क्यांनी घसरून ६९७.७० रुपयांवर आला आणि शेअरला लोअर सर्किट लागलं. अदानी टोटल गॅसचा शेअर १४ टक्क्यांनी घसरून ५७७.८० रुपये, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर १८ टक्क्यांनी घसरून ११५९ रुपये, एसीसीचा शेअर १० टक्क्यांनी घसरून १९६६.५५ रुपयांवर आला. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड सेझचे शेअरही १० टक्क्यांनी घसरून ११६० रुपयांवर, अदानी विल्मरचा शेअर ८ टक्क्यांनी घसरून ३०१ रुपयांवर आला आहे.