Maharashtra Election: तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आज आणि उद्या करुन घ्या. कारण, २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत ४८ तास अगोदर म्हणजेच १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. मतदानाच्या दिवशी बँका आणि शाळांनाही सुट्टी असणार आहे. याशिवाय त्या दिवशी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. २६ नोव्हेंबरला विधानसभा विसर्जित होणार आहे.
NSE कडून अधिसूचना जारी
NSE ने आपल्या ८ नोव्हेंबर रोजीच्या अधिसूचनेत म्हटले होते की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात व्यापार सुट्टी जाहीर केली आहे. बीएसई आणि एनएसई वर इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही व्यापार होणार नाहीत. एवढेच नाही तर करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील व्यापारही बंद राहणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि नॅशनल कमोडिटी एक्सचेंज (NCDEX) या तारखेला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ दरम्यान व्यवहार करणार नाहीत.
शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही
या महिन्यात बाजारात एकूण ३ सुट्ट्या पाळण्यात आल्या. मुहूर्ताच्या व्यवहारामुळे १ नोव्हेंबरला बाजार बंद होता. सायंकाळी काही काळासाठी उघडण्यात आला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त बाजारातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा २० नोव्हेंबरला बाजार बंद राहणार आहे. म्हणजे एकूण ३ अतिरिक्त दिवस बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.
बँकांनाही सुट्टी जाहीर
आज (१८ नोव्हेंबर) कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटकातील सर्व बँका बंद आहेत. सेंग कुत्स्नेम निमित्त मेघालयात २३ नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील. तसेच २३ नोव्हेंबर हा चौथा शनिवार आहे. सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (यूटी) रविवार, २४ नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील. जर तुम्हाला या ३ दिवसांत महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील तर तुम्ही तुमचे काम बँकेच्या वेबसाइट आणि मोबाइल बँकिंग ॲपद्वारे करू शकता. तुम्ही एटीएममध्येही पैसे काढू शकता. पण बँकेत जाऊन तुम्हाला कोणतेही अधिकृत काम करता येणार नाही. दरम्यान, शाळा महाविद्यालयांनाही या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.