SEBI Bans Anil Ambani : बाजार नियामक सेबीनं (SEBI) उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बाजार नियामक सेबीनं त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय त्यांच्यावर ५ वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घालण्यात आलीये. अनिल अंबानी यांच्याव्यतिरिक्त रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य २४ कंपन्यांवर सेबीनं कंपनीकडून पैसे वळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
५ वर्षांची बंदी
सेबीच्या या कारवाईनंतर अनिल अंबानी कोणत्याही लिस्टेड कंपनी किंवा मार्केट रेग्युलेटरकडे रजिस्टर्ड कोणत्याही मध्यस्थात संचालक किंवा मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी (केएमपी) म्हणून ५ वर्षे सिक्युरिटीज मार्केटमध्ये सामील होऊ शकणार नाहीत. याशिवाय रिलायन्स होम फायनान्सवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून त्यावर सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सेबीच्या चौकशीत घोटाळा उघडकीस
'अनिल अंबानी यांनी आरएचएफएलच्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आरएचएफएलमधून निधी काढण्यासाठी एक फसवी योजना राबविली होती, जी त्यांनी त्यांच्याशी संबंधित संस्थांसाठी कर्ज म्हणून ठेवली होती,' असं सेबीच्या २२ पानांच्या अंतिम आदेशात म्हटलंय.
नियमांकडे दुर्लक्ष
आरएचएफएलच्या संचालक मंडळानं अशा प्रकारच्या कर्ज पद्धती रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या होत्या आणि कॉर्पोरेट कर्जाची नियमित छाननी केली होती, परंतु कंपनी व्यवस्थापनानं या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचंही म्हटलं आहे.