Mazagon Dock Share Price : जहाज तयार करणारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सनं (Mazagon Dock Share) तेजीसह ३४०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा आयपीओ सुमारे ४ वर्षांपूर्वी १४५ रुपयांना आला होता. गुरुवारी ३० मे रोजी कंपनीचा शेअर ३४७८.१५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. आयपीओच्या किमतीच्या तुलनेत जहाज कंपनीचे शेअर्स २५०० टक्क्यांहून अधिक वधारलेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सनं गुरुवारी उच्चांकी पातळी गाठली. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ७६८.४५ रुपये आहे.
४ वर्षांपूर्वी आलेला आयपीओ
माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा आयपीओ २९ सप्टेंबर २०२० रोजी उघडला होता आणि १ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १४५ रुपये होती. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई शेअर बाजारात २१६.२५ रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर १७३ रुपयांवर बंद झाला. दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांत शिपिंग कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे.
वर्षभरात ३२१ टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षभरात जहाज कंपनीच्या शेअरमध्ये ३२१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ३० मे २०२३ रोजी कंपनीचा शेअर ८०१.४५ रुपयांवर होता. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर ३० मे २०२४ रोजी ३४७८.१५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत माझगाव डॉकच्या शेअरमध्ये ७३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या महिनाभरात माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
दुपटीपेक्षा अधिक नफा वाढला
मार्च २०२४ तिमाहीत माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा नफा दुप्पटीपेक्षा अधिक वाढलाय. जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत कंपनीला ६६३ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३२६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. माझगाव डॉकनं आर्थिक वर्ष २०२४ साठी १२.११ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)