Join us  

फ्युचर आणि ऑप्शन ट्रेड करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीच्या आदेशानंतर बदलले चार्जेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 9:55 AM

MCX F&O New Charges : MCX ने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडसाठी शुल्क दर बदलले आहेत. F&O ट्रेडसाठी नवीन दर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणार आहेत.

MCX F&O New Charges: फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. देशातील सर्वात मोठे बिगर कृषी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडसाठी शुल्क दर बदलले आहेत. बाजार नियामक प्राधिकरण सेबीच्या निर्देशानंतर MCX ने हा बदल केला आहे. नुकताच सेबीने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेड करणाऱ्यांचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये १० पैकी ९ ट्रेडर्सने पैसे गमावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. त्यानंतर आता सेबीने फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी शुल्कात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. 

फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी किती असणार शुल्क?मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) ने केलेल्या बदलांनंतर, फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी प्रत्येक १ लाख रुपयांच्या व्यवहारासाठी २.१० रुपये व्यवहार शुल्क आकारले जाईल. तर ऑप्शन क्रॉन्ट्रॅक्टसाठी प्रीमियम टर्नओव्हर मूल्यामध्ये प्रत्येक लाख रुपयांवर ४१.८० रुपये शुल्क आकारले जाईल. MCX ने मंगळवारी एका परिपत्रकात नवीन शुल्कांची माहिती दिली. १ ऑक्टोबरपासून नवे शुल्क लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सेबीच्या निर्देशानंतर एमसीएक्सकडून बदलबाजार नियामक प्राधिकरण सेबीने MCX ला F&O शुल्काबाबत सूचना जारी केल्या होत्या. SEBI ने त्यांना टिअर्ड फी सिस्टम ऐवजी फिक्स ट्रान्झॅक्शन फी स्ट्रक्चर अवलंबण्यास सांगितले होते. एमसीएक्ससह अनेक बाजार संस्था स्लॅब आधारित फी रचनेनुसार काम करत होत्या. सेबीने यावर आक्षेप घेतला होता.

ट्रेडर्सचा भार हलका होणारवेगवेगळ्या स्लॅब स्ट्रक्चरमुळे ट्रेडर्सला अनेकदा अधिक शुल्क द्यावे लागत होते. सेबीने सांगितले, स्लॅब आधारित रचनेत, बाजार संस्थेला ट्रेडर्सकडून आकारले जाणारे शुल्क दिले जात नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारणास्तव सेबीने आता समान शुल्क रचना करण्यास सांगितले आहे. यामुळे ग्राहकांवर (F&O व्यापारी) शुल्काचा बोजा कमी होणार आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक