Bajaj Housing Finance Share : बजाज ग्रुपची हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सनं लिस्ट होताच धुमाकूळ घातला. १६ सप्टेंबर रोजी आयपीओच्या विक्रमी बोलीनंतर ७० रुपयांचा शेअर ११४ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाला होता. पहिल्याच दिवशी शेअरला १० टक्क्यांचं अपर सर्किट लागून तो १६५ रुपयांपर्यंत गेला. आता आणखी सांगायचं झालं तर या शेअरला पहिलं बाय रेटिंग मिळालंय. ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलनं या शेअरला 'बाय' रेटिंगसह कव्हरेज सुरू केलंय. तसंच याची टार्गेट प्राईज २१० रुपये निश्चित केली आहे. ही किंमत आयपीओच्या किंमतीच्या तिप्पट आहे.
काय म्हटलंय ब्रोकरेजनं?
बजाज हाऊसिंग फायनान्सची ५० लाख रुपयांपर्यंतची तिकीट साईज अतिशय आकर्षक आहे आणि देशातील होम लोन मार्केटमध्ये ६५ टक्के याचंच वर्चस्व आहे. याशिवाय बजाज हाऊसिंग फायनान्सचा फोकस लीज रेंटल डिस्काऊंट वाढत असून ते सकारात्मक आहे. यामध्ये यील्डदेखील अधिक आहे. पुढील ३ वक्षांत बजाज हाऊसिंग फायनान्सची बॅलन्स शीट २ लाख कोटी रुपयांपर्यंत होऊ शकते आणि यात कन्स्ट्रक्शन फायनान्सचा हिस्सा ८ ते १० टक्क्यांदरम्यान राहू शकतो, असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.
धमाकेदार लिस्टिंग
बजाज समूहाची हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स सोमवारी ११४ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले. धमाकेदार लिस्टिंगनंतर शेअर्सची खरेदी आणखी वाढली आणि त्यानंतर शेअर १० टक्क्यांच्या अपर सर्किटवर गेला. कंपनीच्या आयपीओलाही ३.१५ लाख कोटी रुपयांची विक्रमी बोली लागली आणि आता शेअर बाजारात त्याच्या दमदार एन्ट्रीमुळे गुंतवणूकदार सुखावले. गुंतवणूकदारांना हे शेअर्स ७० रुपये दरानं देण्यात आले. ६,५६० कोटी रुपयांच्या आयपीओवर एकूण ६७ पट बोली लागली होती. मंगळवारीही या शेअरमधील तेजी कायम होती.
३ लाख कोटींपेक्षा अधिकचं सबस्क्रिप्शन
बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. ऑफरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बुधवारी ६,५६० कोटी रुपयांच्या इश्यूला ६३.६० पट सब्सक्राइब करण्यात आलं. यासाठी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोली लागली. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओमध्ये ७२,७५,७५,७५६ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत एकूण ४६,२७,४८,४३,८३२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)