Join us  

मान्सूनने ७ लाख काेटींनी केले श्रीमंत, आता लागू शकताे ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 7:32 AM

या सप्ताहात नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात विक्री वाढण्याने बाजाराच्या वाढीला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 

- प्रसाद गो. जोशी

देशाच्या बऱ्याच भागांत सक्रिय झालेला माॅन्सून, परकीय वित्तसंस्थांनी केलेली जोरदार खरेदी, सकारात्मक राहिलेले जागतिक बाजारांमधील वातावरण अशा विविध बाबींमुळे गतसप्ताहामध्ये बाजारात बैलाचा सुसाट संचार दिसून आला. सेन्सेक्स, निफ्टीसह काही निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. या सप्ताहात नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात विक्री वाढण्याने बाजाराच्या वाढीला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 

गतसप्ताहात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने १७३९.१९ अंशांची वाढ देऊन निर्देशांक ६४,७१८.५६ अंश असा विक्रमी उंचीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा विक्रमी बंद झाला आहे. गत सप्ताहापेक्षा त्यामध्ये ५२३.५५ अंशांची वाढ होऊन तो १९,१८९.०५ अंशांवर पोहोचला आहे. 

जूनमध्ये परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक १० महिन्यांतील सर्वाधिकजून महिन्यामध्येही परकीय संस्था भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करीत असल्याचे दिसून आले. या संस्थांनी जून महिन्यात शेअर बाजारामध्ये ४७,१२८ कोटींची गुंतवणूक केली आहे. गेल्या १० महिन्यांमधील ही त्यांची सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे. याआधी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या संस्थांनी भारतीय बाजारात अनुक्रमे ११६३१ कोटी व ४३,८३८ कोटी रुपये गुंतविले आहेत. या कॅलेंडर वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतातून रक्कम काढून घेतली आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत झाली एवढी वाढगतसप्ताहामध्ये निर्देशांक नवीन उंचीवर पोहोचल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. मुंबई शेअर बाजारातील सर्वच कंपन्यांच्या मालमत्ता मूल्यामध्ये सप्ताहामध्ये ७ लाख २७२.६३ कोटी रुपयांची वाढ झाल्याने गुंतवणूकदार कागदोपत्री श्रीमंत बनले आहेत.

या गाेष्टींवर असेल बाजाराची नजरया सप्ताहात बाजार प्रथम वाहनविक्रीचे आकडे व एचडीएफसीचे विलीनीकरण यावर प्रतिक्रिया देईल. त्यानंतर जाहीर होणारे पीएमआय व सेवा क्षेत्राचा पीएमआय यावर बाजाराची नजर राहील. फेडरल ओपन मार्केट कमिटी बैठकीच्या अहवालावरही बाजाराची दिशा ठरणार आहे.

नफेखाेरीची शक्यताअमेरिकेमधील व्याजदरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. भारतीय बाजार उच्चांकावर पोहोचला असल्याने यापुढे काही काळ नफा कमविण्यासाठी विक्री केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, भारताची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता परकीय वित्तसंस्था गुंतवणुकीमध्ये आणखी सक्रिय होतील. 

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय