मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं (Motilal Oswal Financial) आपल्या गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. कंपनीनं 3:1 या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केलीये. म्हणजेच मोतीलाल ओसवाल फायनान्शियल गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरमागे 3 बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याची घोषणा केलीये. मोतीलाल ओसवाल फायनान्शियलनं अद्याप बोनस शेअर्सच्या रकॉर्ड डेटची घोषणा केली नाहीये. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 5 टक्क्यांहून अधिक वधारून 2600.65 रुपयांवर बंद झाला.
कंपनीच्या नफ्यात 334% ची जोरदार वाढ
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियलनं मार्च 2024 तिमाहीत निव्वळ नफ्यात 334% वाढ नोंदविली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियलला जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीत 724.6 कोटी रुपयांचा नफा झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा 167 कोटी रुपये होता. मार्च 2024 तिमाहीत मोतीलाल ओसवाल फायनान्शियलचा महसूल 108 टक्क्यांनी वाढून 2141.3 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 1027.4 कोटी रुपये होता.
वर्षभरात 315% वाढले शेअर्स
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झालीये. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 315 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचा शेअर 27 एप्रिल 2023 रोजी 626.55 रुपयांवर होता. 26 एप्रिल 2024 रोजी शेअर 2600.65 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यांत मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलच्या शेअरमध्ये 168 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. 27 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीचा शेअर 969.50 रुपयांवर होता, जो आता 2600 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत 107 टक्क्यांची वाढ झाली. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सनी या वर्षाच्या 4 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)