Join us  

'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 3:30 PM

Top 10 Most Expensive Stocks In India: शेअर बाजारात लोक सहसा स्वस्त आणि क्वालिटी शेअर्सच्या शोधात असतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या १० शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे.

Top 10 Most Expensive Stocks In India:  शेअर बाजारात लोक सहसा स्वस्त आणि क्वालिटी शेअर्सच्या शोधात असतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या १० शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांच्या  शेअर्सच्या किंमतीही अधिक असतात. यामध्ये एमआरएफ, पेज इंडस्ट्रीज आणि श्री सिमेंट सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागड्या १० शेअर्सबद्दल...

MRF Ltd - टायर उत्पादक एमआरएफ लिमिटेडचा एक शेअर सुमारे १२४३६६ रुपयांवर आहे. कंपनीच्या शेअरनं वर्षभरात १४ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत ९० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी १,१५१,२८३ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५२,६११ कोटी रुपये आहे. कंपनी टायर, ट्रेड, ट्यूब आणि कन्व्हेअर बेल्ट, पेंट आणि खेळणी यासह रबर उत्पादनं तयार करते.

Honeywell Automation India Ltd: हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड हा भारतातील दुसरा सर्वात महागडा शेअर आहे. सोमवारी कंपनीचा शेअर ५००४९ रुपयांवर पोहोचला. त्याचा एक वर्षाचा परतावा ३८ टक्के आणि पाच वर्षांचा परतावा ७५ टक्के आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ५९,७०० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४३,७७१ कोटी रुपये असून इलेक्ट्रॉनिक्स-इंस्ट्रुमेंटेशन आणि प्रोसेस कंट्रोल इक्विपमेंट इंडस्ट्रीमध्ये ही कंपनी मार्केट लीडर आहे.

Page Industries Ltd: इनवेअर तयार करणारी पेज इंडस्ट्रीज हा भारतीय शेअर बाजारातील तिसरा सर्वात महागडा शेअर आहे. आज, २८ ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर ४३४१६ रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरनं एका वर्षात १५ टक्के आणि पाच वर्षांत ७२ टक्के परतावा दिलाय. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी ४६,८१७.६५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४८,०६५.३३ कोटी रुपये आहे. पेज इंडस्ट्रीज लिमिटेडची सध्या १५ उत्पादन प्रकल्प आहेत. युएईमध्ये सहा आणि श्रीलंकेत तीन जॉकी एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्सही आहेत.

Bosch Ltd: बॉश लिमिटेडचा शेअर सध्या ३६१६०.५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. बॉश लिमिटेडच्या शेअर्सनं गेल्या वर्षभरात ८५ टक्के आणि पाच वर्षांत १३५ टक्के दमदार परतावा दिलाय. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ३९,०५२ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,०६,४८९ कोटी रुपये आहे. बॉश लिमिटेड ही बॉश ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी आहे. 

3M India Ltd: थ्रीएम इंडियाच्या शेअरची किंमत ३३७३५.०५ रुपये आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी ४१,००० रुपये आहे. या शेअरनं एका वर्षात १३ टक्के आणि पाच वर्षांत ५१ टक्के परतावा दिलाय. कंपनीचं मार्केट कॅप ३७,७३७.२५ कोटी रुपये आहे. कंपनी विविध बाजारपेठांसाठी विशेष उपकरणं आणि सेवांचं डिझाइन, उत्पादन आणि वितरण करते.

Abbott India Ltd: अॅबॉट इंडियाच्या शेअरची किंमत २८५०३ रुपये आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी ३०,४९९ रुपये आहे. अॅबॉट इंडियाच्या शेअरमध्ये वर्षभरात २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर पाच वर्षांत या शेअरमध्ये १४३ टक्के वाढ झाली. कंपनीचं मार्केट कॅप ६०,१६९ कोटी रुपये आहे. १९१० मध्ये स्थापन झालेली अॅबॉट इंडिया ही देशातील सर्वात जुनी आणि आरोग्य सेवा देणारी कंपनी आहे. 

Shree Cement Ltd: श्री सिमेंट कंपनीच्या शेअरची किंमत २५१३३ रुपये आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ३०,७१० रुपये आहे. श्री सिमेंटच्या शेअरनं वर्षभरासाठी ३ टक्क्यांचा निगेटिव्ह परतावा दिलाय. त्याचबरोबर पाच वर्षांत २५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९०,५६२ कोटी रुपये आहे. श्री सिमेंट ही एक भारतीय सिमेंट उत्पादक कंपनी आहे, ज्याची स्थापना १९७९ मध्ये राजस्थानमधील ब्यावर येथे झाली. आता त्याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि ही भारतातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट उत्पादक आहे.

Saraswati Commercial (India) Ltd: सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड या शेअरची किंमत १७,५९९ रुपये आहे. कंपनीच्या शेअरनं वर्षभरात ५२०.२१ टक्के दमदार परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ५०० टक्क्यांनी वधारलाय. पाच वर्षांत त्यात २४ हजार टक्के वाढ झाली आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत २७,७७५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,७६७ कोटी रुपये आहे. सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड ही भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे.

Procter & Gamble Hygiene and Health Care Ltd: प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थकेअर लिमिटेड या शेअरची किंमत १६०२० रुपये आहे. कंपनीच्या शेअरनं वर्षभरात ५ टक्के निगेटिव्ह परतावा दिला आहे. पाच वर्षांत हा शेअर ३० टक्क्यांनी वधारलाय. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १९,०८६ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५१,२५६ कोटी रुपये आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडची स्थापना १९६७ मध्ये मर्कच्या आशियाई उपकंपन्यांपैकी एक म्हणून भारतात झाली. १९८१ साली सार्वजनिक झालेली ही मर्क ग्रुपची पहिली कंपनी होती.

Dixon Technologies (India) Ltd: डिक्सनच्या या शेअरची किंमत १४३३३.५० रुपये आहे. डिक्सन टेकच्या शेअर्सनं एका वर्षात १८० टक्के आणि पाच वर्षांत २३०० टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १५,९९९ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८५,४२२.४२ कोटी रुपये आहे. डिक्सन ही इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) कंपनी आहे, ती प्रसिद्ध ब्रँडसाठी विविध प्रकारची उत्पादने तयार करते. कंपनीच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, लाइटिंग प्रॉडक्ट्स, मोबाइल फोन आणि सिक्युरिटी सिस्टिमचा समावेश आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. बीएसईवर २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार हा डेटा देण्यात आलाय. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक