MRF Share Price: एमआरएफ हा देशातील सर्वात महागडा स्टॉक आहे. मार्च तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसूनही कंपनी आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा डिविडंड देणार आहे. दरम्यान, मोठ्या विक्रीमुळे कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले. कंपनीनं मार्च तिमाहीच्या निकालासह १९४ रुपये प्रति शेअर फायनल डिविडंड जाहीर केला आहे, जो १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या हिशोबानं १९४० टक्के आहे. मात्र, या डिविडंडचा शेअर्सवर फारसा परिणाम झाला नाही आणि त्यात घसरण दिसून आली. कामकजादरम्यान बीएसईवर कंपनीचा शेअर ४.३७ टक्क्यांनी घसरून १,२८,०७५.३० रुपयांवर होता.
इंट्रा डे मध्ये शेअर ४.५७ टक्क्यांनी घसरून १,२७,८००.०० रुपयांवर आला. गेल्या वर्षी ४ मे २०२३ रोजी तो ९२,०६०.३० रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता आणि २३ फेब्रुवारी २०२४ रोजी १,५१,२८३.४० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
मार्च तिमाही निराशाजनक
मार्च तिमाही एमआरएफसाठी काही खास नव्हती. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जानेवारी ते मार्च २०२४ या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ७.६ टक्क्यांनी घसरून ३७९.६ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचं एबिटडा मार्जिन ०.४० टक्क्यांनी कमी होऊन १४.७ टक्क्यांवरून १४.३ टक्क्यांवर आलं. मार्च २०२४ तिमाहीत कंपनीनं ६२१५.१ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग महसूल मिळवला, जो वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी अधिक आहे.
आर्थिक वर्ष २०२३ बाबत सांगायचं झालं तर कंपनीनं १६९ रुपयांचा फायनल डिविडंड दिला होता आणि दोन वेळा अंतरिम डिविडंड मिळून शेअरहोल्डर्सना १७५ रुपयांचा डिविडंड देण्यात आला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)