MRF Share Record High: बुधवार(दि.17) रोजी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टीत 460 अंकांची घसरण झाली. यादरम्यान, सर्वात मोठा तोटा बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाला. हा 2000 अंकांपेक्षा जास्त किंवा 4 टक्क्यांनी घसरला. मात्र, यादरम्यान एका स्टॉकने ऐतिहासिक कामगिरी केली. या शेअरने चक्क प्रति शेअर 1.50 लाख रुपयांचा टप्पा पार केला.
भारतीय शेअर बाजारातील सर्वात महाग स्टॉक असलेल्या MRF ने आज इतिहास रचला. कंपनीचे शेअर्स इंट्राडेदरम्यान 10 टक्के किंवा Rs 13520.7 ने वाढून प्रति शेअर 1.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. ही त्याची आजपर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. याआधी हा शेअर मंगळवारी प्रति शेअर 136479.30 रुपयांवर बंद झाला होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 57 हजार कोटी रुपये झाले आहे.
MRFचा स्टॉक वाढून घसरला
आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठल्यानंतर एमआरएफच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बुधवारी सकाळी त्याचे शेअर्स 1,36,229 रुपयांवर उघडले. शेअर बाजारातील घसरण सुरूच राहिली, परंतु या काळात शेअर अचानक 10 टक्क्यांनी वाढून 1,50,254.16 रुपये प्रति शेअर झाला. पण, नंतर तो 1.46% किंवा 1,994.66 रुपयांनी घसरुन प्रति शेअर 1,34,600.05 रुपयांवर बंद झाला.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)