Join us

MRF चा शेअर गडगडला; वर्षभरात 40,000 रुपयांनी घसरला, जाणून घ्या ताजे दर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:52 IST

MRF Stock Price: एकेकाळी MRF चा शेअर देशातील सर्वात महाग शेअर होता.

MRF Stock Price: आजच्या घडीला शेअर बाजारात असंख्य लोक गुंतवणूक करतात. प्रत्येकाला वाटते की, आपल्या पोर्टफोलिओमध्ये MRF सारखा स्टॉक असावा. याचे कारण म्हणजे, गेल्या दोन दशकात MRF च्या शेअरने खूप मोठी उडी घेतली आहे. यामुळे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहे. पण, MRF चा शेअर गेल्या वर्षभरापासून थंडावलेला आहे.

मंगळवारी MRF शेअर्सने 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. हा शेअर 1,12,400 रुपयांपर्यंत घसरला, जी एका वर्षातील नीचांकी पातळी आहे. तर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,51,445 रुपये आहे. गेल्या एका वर्षातील शेअरची अवस्था पाहिली तर, या शेअरमध्ये सुमारे 20 टक्के घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका महिन्यात हा शेअर सुमारे 14 टक्क्यांनी घसरला आहे.

हा शेअर उच्च पातळीपासून सुमारे 40,000 रुपयांनी खाली आला आहे. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे, ऑटोमोबाईल क्षेत्र दबावाखाली आहे आणि भारतीय शेअर बाजारदेखील गेल्या 4 महिन्यांपासून घसरणीच्या काळातून जात आहे, त्यामुळे यात सातत्याने घसरण होत आहे. या घसरणीमुळे एमआरएफचे मार्केट कॅप 48 हजार कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीच्या दीर्घकालीन कामगिरी पाहिल्यास, या शेअरने गेल्या 5 वर्षांत सुमारे 60 टक्के परतावा दिला आहे.

देशातील सर्वात महाग शेअर कोणता?एकेकाळी MRF चा शेअर हा देशातील सर्वात महाग शेअर होता. मात्र सध्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने हा शेअर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या एलसिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर पहिल्या क्रमांकावर आहे. हा देशातील सर्वात महाग शेअर आहे. सध्या एलसिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर 1,37,010 रुपयांवर आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक