Mukesh Ambani: देशातील दिग्गज अंबानी कुटुंबात लवकरच 'शहनाई' वाजणार आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे जुलैमध्ये लग्न होणार असून, येत्या 1 ते 3 मार्चदरम्यान प्री-वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. या आनंदाच्या वातावरणात रिलायन्सच्या अध्यक्षांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या रिलायन्सने मोठी कमाई केली आहे. शेअर बाजारातील 5 दिवसांच्या व्यवहारात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 40,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
रिलायन्सचे भागधारक मालामालगेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1,10,106.83 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापैकी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला आहे. रिलायन्सच्या भागधारकांनी अवघ्या पाच दिवसांत तब्बल 43,976.96 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे रिलायन्सचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 20,20,470.88 कोटी रुपयांपर्यंत वाढले.
या कंपन्यांच्या MCap मध्ये वाढआयसीआयसीआय बँकेचा MCap वाढून रु. 7,44,808.72 कोटी झाला. बँकेच्या गुंतवणुकदारांनी एका आठवड्यात 27,012.47 कोटी रुपये कमावले. यानंतर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चे मार्केट कॅप रु. 17,235.62 कोटींनी वाढून रु. 6,74,655.88 कोटी झाले. यासोबतच, ITC चे बाजार भांडवल 8,548.19 कोटी रुपयांनी वाढून 5,13,640.37 कोटी रुपये झाले. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने पाच दिवसांत 4,534.71 कोटी रुपये कमावले आणि त्यांचे बाजार भांडवल वाढून 5,62,574.38 कोटी रुपये झाले.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली असून कंपनीच्या गुंतवणूकदारांनी एका आठवड्यात 4,149.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कालावधीत एसबीआयचे मार्केट कॅप 6,77,735.03 कोटी रुपयांपर्यंत वाढले. भारती एअरटेलचे बाजार मूल्यदेखील 3,855.73 कोटी रुपयांनी वाढून 6,34,196.63 कोटी रुपये पोहचले. HDFC बँकेचे बाजार मूल्यदेखील 793.21 कोटी रुपयांनी वाढून 79,286.5 कोटी झाले.
(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)