Join us  

६ टक्क्यांपर्यंत कमी झालं अंबांनींच्या 'या' कंपनीचं प्रॉफिट; तरी एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, ३८० पर्यंत जाणार भाव"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:20 AM

Jio Financial Q1 results: कंपनीनं सोमवारी जून तिमाहीचे तिमाही निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचा एकत्रित नफा ५.८१ टक्क्यांनी घसरून ३१२.६३ कोटी रुपये झाला आहे.

Jio Financial Q1 results: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं सोमवारी जून तिमाहीचे तिमाही निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ (Q1 FY25) जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा एकत्रित नफा ५.८१ टक्क्यांनी घसरून ३१२.६३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत (Q1 FY24) नफा ३३१.९२ कोटी रुपये होता. त्याचवेळी कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ०.८९ टक्क्यांनी वाढून ४१७.८२ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ४१४.१३ कोटी रुपये होता.

काय आहेत डिटेल्स?

तिमाही निकालांबरोबरच जिओ फायनान्शियलने जून २०२४ मध्ये एअरफायबर उपकरणं भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केल्याचंही जाहीर केलंय. दरम्यान, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) मधून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये (CIC) रुपांतरित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) मान्यता मिळाली असल्याचं नुकतंच कंपनीनं सांगितलं होतं.

शेअर्सची स्थिती काय?

कंपनीचा शेअर सोमवारी कामकाजाच्या अखेरीस ३५५.४० रुपयांवर बंद झाला होता. शेअरमध्ये महिन्याभरात २.१६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर या वर्षी आतापर्यंत हा शेअर ५२ टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत ३४ टक्क्यांनी वधारलाय. 

दरम्यान, शेअर बाजारातील एक्सपर्ट या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत. "हा शेअर अल्पावधीत ३८० रुपयांच्या टार्गेट प्राईजपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी स्टॉप लॉस ३४५ रुपये ठेवला पाहिजे," अशी प्रतिक्रिया रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल रिसर्च) रवी सिंह म्हणाले. तर दुसरीकडे वित्तीय सेवा देणारी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं नुकतीच 'जिओ फायनान्स अॅप'चं प्रायोगिक व्हर्जन लॉन्च करण्याची घोषणा केली होती.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजार