mukesh ambani : आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने नवी मुंबई आयआयए (NMIIA) मध्ये ७४ टक्के हिस्सा खरेदी केला आहे, ज्यासाठी रिलायन्सने १,६२८ कोटी रुपये खर्च केले आहेत. एनएमआयआयए ही कंपनी महाराष्ट्रात इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया (IIA) विकसित करण्याचे काम करते. ११ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या आरआयएल बोर्डाच्या बैठकीनंतर आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी सिडकोच्या संमतीनंतर हे अधिग्रहण करण्यात आले आहे.
या करारानंतर NMIIA ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी बनली आहे. सिडकोची २६ टक्के हिस्सेदारी असून आता ७४ टक्के हिस्सेदारी मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडे गेली आहे. रिलायन्सने NMIIA चे ५७,१२,३९,५८८ शेअर्स २८.५० रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले आहेत. महाराष्ट्र सरकारने IIA च्या विकासासाठी 'विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून NMIIA ची नियुक्ती केली आहे. हे प्राधिकरण शहराचे नियोजन आणि विकास पाहणार आहे.
कंपनीने काय माहिती दिली?कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की ११ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने दिलेली मान्यता आणि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) ची संमती मिळाल्यानंतर १२ डिसेंबर २०२४ रोजी ५७,१२,३९,५८८ इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेड (NMIIA) मध्ये रिलायन्सचा ७४% हिस्सा झाला आहे. आता NMIIA मध्ये सिडकोचे उर्वरित २६% इक्विटी शेअर्स आहेत.
कंपनीचा व्यवसाय कसा आहे?या अधिग्रहनानंतर NMIIA ही कंपनीची उपकंपनी बनली आहे. १५ जून २००४ रोजी स्थापन झालेली, NMIIA महाराष्ट्रातील नोंदणीकृत औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात माहिर आहे. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत "विशेष नियोजन प्राधिकरण" म्हणून ओळखल्या गेलेल्या, NMIIA ने ३४.८९ कोटी रुपये (FY24), ३२.८९ कोटी रुपये (FY23) आणि ३४.७४ कोटी रुपयांची (FY22) उलाढाल केली आहे.
रिलायन्सचे शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, त्यांचे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी वाढले आणि १,२७४.४५ रुपयांवर बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ३ ते ४ टक्के परतावा दिला आहे.