Mukesh Ambani Company : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गुंतवणूक केलेल्या एका कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यानुसार, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आलोक इंडस्ट्रीज, असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीचा एकूण निव्वळ तोटा वाढून रु. 262.10 कोटींवर पोहोचला आहे. ही कंपनी कापड उत्पादनाच्या व्यवसायात असून, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शनची यात संयुक्त मालकी आहे.
आलोक इंडस्ट्रीजच्या (Alok Industries Share) नियामक फायलिंगनुसार, कंपनीला एका वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर या कालावधीत 174.83 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 35.46 टक्क्यांनी घसरुन रु. 885.66 कोटी झाले, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत ते रु. 1,372.34 कोटी होते. सप्टेंबर तिमाहीत एकूण खर्च 25.45 टक्क्यांनी घसरून 1,160.63 कोटी रुपये झाला आहे. तर, आलोक इंडस्ट्रीजचे इतर उत्पन्नासह एकूण उत्पन्न सप्टेंबर तिमाहीत 34.97 टक्क्यांनी घसरून 898.78 कोटी रुपये झाले आहे.
शेअर्समध्ये मोठी घसरण
सोमवारी बीएसईवर आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 24.62 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी हा शेअर 2.15 टक्क्यांनी घसरुन 24.03 रुपयांवर व्यवहार करत होता. तर, गेल्या पाच दिवसांत आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स 5.54 टक्क्यांनी घसरले होते. तर, गेल्या सहा महिन्यांत 11 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. पण, जानेवारीपासून या शेअरमध्ये 11 टक्क्यांनी वाढही झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा किती हिस्सा
आलोक इंडस्ट्रीजमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा 40.01 टक्के आणि जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे 34.99 टक्के हिस्सा आहे. कंपनी होम टेक्सटाईल, कॉटन यार्न, ॲपेरल फॅब्रिक, कापड आणि पॉलिस्टर यार्न बनवते.
(टीप- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या.)