Mukesh Ambani : आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे. यामधून जिग्गज उद्योगपतीही सुटले नाहीत. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज पुन्हा घसरले आहेत. बीएसईवर तो १.५% पेक्षा जास्त घसरून १२७८.७० रुपयांवर आला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीचे शेअर्स जुलैमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. परंतु, तेव्हापासून तिचे मार्केट कॅप सुमारे ५० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ४२,१८,६३,२५,००,००० रुपयांनी घसरले आहे. सध्या त्याचे मार्केट कॅप सुमारे १७,३९,५८६.५४ कोटी रुपये आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचे श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरले आहे.
आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय रिफायनिंगपासून रिटेलपर्यंत विस्तारलेला आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी वाढ झाली आहे. हे बेंचमार्क NSE निफ्टी ५० निर्देशांकापेक्षा जवळपास दशकभरातील सर्वात मोठ्या फरकाने मागे आहे. परकीय विक्री आणि उत्पन्न वाढीच्या चिंतेमुळे अलिकडच्या काही महिन्यांत शेअर बाजारात झपाट्याने घसरण झाली आहे. अशा परिस्थिती देशाचे प्रमुख निर्देशांक अजूनही २०२४ मध्ये आशियातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आहेत.
शेअर बाजार का कोसळतोय?
रिलायन्सने गेल्या महिन्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. सलग सहाव्या तिमाहीत कंपनीची कमाई अंदाजापेक्षा कमी होती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीचा मुख्य व्यवसाय तेल ते केमिकल व्यवसायात मागणी कमी राहिली. या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीत कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरसाठी एक मोफत शेअर देऊ केला होता. मात्र, कंपनीने आपल्या दूरसंचार आणि किरकोळ युनिट्सच्या सूचीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. टॅरिफ वाढल्यानंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे. या सर्वांचा परिणाम रिलायन्सच्या व्यवसायावर झाला आहे.