Join us

सलग तिसऱ्या दिवशी मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट, ५ वर्षांत ५०००% रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 2:21 PM

otus Chocolate Share Price : भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीच्या शेअर्सनं आज सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी पातळी गाठली. गेल्या तीन सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीच्या लोटस चॉकलेट (Lotus Chocolate) या कंपनीच्या शेअर्सनं आज सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी पातळी गाठली. गेल्या तीन सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सची (आरसीपीएल) उपकंपनी आहे. आरसीपीएल ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. रिलायन्स रिटेलच्या प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार उघडताच लोटस चॉकलेटचा शेअर पाच टक्क्यांनी वधारून ८११.१० रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात तो ७७२.५० रुपयांवर बंद झाला होता.

लोटस चॉकलेट्सचा नफा पहिल्या तिमाहीत अनेक पटींनी वाढून ९.४१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २० लाख रुपये होता. या कालावधीत कंपनीचा महसूलही ३२.२१ कोटी रुपयांवरून १४१.३१ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच वर्षांत या शेअरनं पाच हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर कोणी पाच वर्षांपूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य ५१ लाख रुपये झालं असतं. 

१९ जुलै २०१९ रोजी याची किंमत १५ रुपये होती. पण रिलायन्स आणि मुकेश अंबानी यांची नावं जोडल्यानंतर या शेअरमध्ये बरीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये २३५ टक्के वाढ झाली आहे. या वर्षी हा शेअर १५४.५३ टक्क्यांनी वधारलाय.

किती रकमेचा करार?

लोटस चॉकलेट्स चॉकलेट, कोको उत्पादनं आणि कोको डेरिव्हेटिव्ह तयार करते. कंपनीची उत्पादनं स्थानिक बेकरींपासून जगभरातील चॉकलेट कंपन्या आणि चॉकलेट युझर्सना पुरवली जातात. या कंपनीची स्थापना १९८८ मध्ये झाली. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनं या कंपनीत ५१ टक्के हिस्सा खरेदी केला. गेल्या वर्षी मे महिन्यात हा करार पूर्ण झाला होता. हा करार ७४ कोटी रुपयांना झाला होता. रिलायन्सनं लोटस चॉकलेटचे शेअर्स ११३ रुपये प्रति शेअर दरानं खरेदी केले. आरसीपीएलनं आपला ब्रँड इंडिपेंडन्स (Independence) लाँच केला आहे. तो देशभरात लाँच करण्याची योजना आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :मुकेश अंबानीशेअर बाजारगुंतवणूक