Multibagger Stock Afcom Holdings : अॅफकॉम होल्डिंग्सच्या शेअर्सना आज पुन्हा अपर सर्किट लागलं आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वाढून ७३२.६५ रुपयांवर पोहोचला. याआधी सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं होतं. गेल्या ११ दिवसात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. १४ नोव्हेंबरला अॅफकॉम होल्डिंग्सच्या शेअर्सची किंमत ४३५ रुपयांच्या पातळीवर होती.
अॅफकॉम होल्डिंगच्या आयपीओसाठी प्राइस बँड १०८ रुपये प्रति शेअर होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ७ पट म्हणजेच ५७८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीची लिस्टिंगही जबरदस्त होती. बीएसई एसएमई सेगमेंटमध्ये ९ ऑगस्ट रोजी ९९ टक्के प्रीमियमसह २१५.४५ रुपयांवर आयपीओ लिस्ट झाला.
कंपनीची कामगिरी कशी होती?
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अॅफकॉम होल्डिंग्स लिमिटेडनं चमकदार कामगिरी केली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात ५४.६४ टक्के वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अॅफकॉम होल्डिंग्सला १८.८६ कोटी रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कालावधीत कंपनीच्या महसुलात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या सहामाहीत अॅफकॉम होल्डिंग्सचं उत्पन्न ८८.७६ कोटी रुपये होतं.
कंपनी काय करते?
ही कंपनी एका विमानतळांपासून दुसऱ्या विमानतळांपर्यंत लॉजिस्टिक सोल्यूशन्स पुरवते. कंपनीचा व्यवसाय भारत, हाँगकाँग, थायलंड, दक्षिण कोरिया, चीन, तैवान येथे पसरलेला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २०५.२० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १८२१.२० कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)