शेअर बाजारात अनेक लार्ज कॅप कंपन्या आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक APL अपोलो ट्युब्सचा आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना तब्बल 859 टक्के परतावा दिला आहे. APL अपोलो ट्युबच्या शेअरची किंमत 27 मार्च 2020 रोजी 127.42 रुपये होती, जी तीन वर्षांनी 27 मार्च 2023 रोजी 1222 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली.
APL अपोलो ट्युबचा स्टॉक गेल्या तीन वर्षात नऊ पटीनं वाढला आहे. तर, कंपनीच्या शेअरमध्ये यावर्षी 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात यात 33.44 टक्क्यांची वाढ झाली आहे. अपोलो ट्युबच्या स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य आज 9.59 लाख झाले असते. 17 फेब्रुवारी 2023 रोजी स्टॉकने 1336 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला आणि 12 मे 2022 रोजी 801.40 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता.
कोणाचा किती हिस्सा?डिसेंबरच्या तिमाहीत सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीतील 68.85 टक्के हिस्सा किंवा 19.09 कोटी शेअर्स होते. पाच प्रवर्तकांकडे गेल्या तिमाहीत 31.15 टक्के किंवा 8.63 कोटी शेअर्स होते. कंपनीच्या निकालांबद्दल बोलायचं झालं तर डिसेंबर तिमाहीत कंपनीला 169.18 कोटी रुपयांचा नफा झाला. तर, मागील तिमाहीत तो 127.88 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 3,230 कोटी रुपयांच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत विक्री वाढून 4,327 कोटी रुपये झाली. डिसेंबर तिमाहीत EBITDA 35 टक्क्यांनी वाढून 272.85 कोटी रूपये झाला.